Mahankali Sugar Factory: ‘महांकाली’वर सगरे गटाचे वर्चस्व

सर्व १७ जागांवर बाजी : महांकाली शेतकरी विकास पॅनेलची बचाव कृती समितीवर मात; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
Mahankali Sugar Factory: ‘महांकाली’वर सगरे गटाचे वर्चस्व
Published on
Updated on

कवठेमहांकाळ : श्री महांकाली सहकारी साखर कारखान्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल अत्यंत अटीतटीच्या वातावरणात बुधवार, दि. ९ सप्टेंबररोजी स्पष्ट झाला. जनसुराज्य शक्ती पक्षाच्या नेतृत्वाखालील व अनिता सगरे यांच्या अध्यक्षतेखालील 'महांकाली शेतकरी विकास पॅनेल'ने 'महांकाली साखर कारखाना बचाव कृती समिती'च्या पॅनेलवर मात करत सर्वच्या सर्व १७ जागांवर निर्णायक आघाडी घेतली. त्यामुळे सगरे गटाने 'महांकाली'चा गड कायम राखल्याचे चित्र आहे. रात्री उशिरापर्यंत निकालाची औपचारिक घोषणा झाली नव्हती.

बुधवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सकाळपासूनच मतमोजणीच्या प्रत्येक फेरीकडे दोन्ही पॅनेलच्या समर्थकांचे लक्ष लागले होते. सुरुवातीच्या फेरीपासूनच महांकाली शेतकरी विकास पॅनेलने सर्व जागांवर आघाडी घेतली आणि रात्री उशिरापर्यंत ही आघाडी भक्कम राहिली. त्यामुळे सगरे गटाच्या समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.

कारखान्याच्या या निवडणुकीत एकूण १४ हजार ८७२ मतदारांपैकी ८ हजार ५८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता; मतदानाची एकूण टक्केवारी ५४.१८ टक्के नोंदवली गेली होती. मतदानानंतर तीन दिवसांनी झालेल्या या मतमोजणीमुळे संपूर्ण तालुक्याचे लक्ष या निकालाकडे लागले होते.

महांकाली शेतकरी विकास पॅनेलकडून (सगरे गट) सर्वसाधारण गटातून अनिता विजयकुमार सगरे, दीपक गणपतराव ओलेकर, जीवन वसंतराव भोसले, सुहास शिवाजीराव पाटील, सागर सूर्यकांत पाटील, मोहन निवृत्ती खोत, भीमराव विठ्ठल कोळेकर, प्रकाश पंडित पाटील-बंडगर, संभाजी सर्जेराव पवार, कुमार आप्पासो पाटील, काशिलिंग शामराव कोळेकर, अरविंद सदाशिव स्वामी व दीपक अच्युतराव चव्हाण, महिला गटातून छाया पुंडलिक पाटील व अनुराधा गणपती सगरे, अनुसूचित जाती-जमाती गटातून निखिल संजय बनसोडे, बिगर उत्पादक गटातून शंतनु विजयकुमार सगरे मैदानात होते.

दुसरीकडे विरोधी महांकाली साखर कारखाना बचाव कृती समिती पॅनेलकडून सर्वसाधारण गटातून मिलिंद शिवपुत्र कोरे, बाळासाहेब शंकर खोत, गजानन शिवलिंग कोठावळे, बाबूगोंडा जनगोंडा पाटील, विक्रम लक्ष्मण कोळेकर, संभाजी पांडुरंग पाटोळे, आप्पासाहेब दत्तात्रय कोळेकर, विठ्ठल रामचंद्र माळी-कोरे, बाळासाहेब बजरंग पाटील, राजेंद्र नामदेव पाटील, सूर्यकांत बापू घागरे, जगन्नाथ बिरू कोळेकर, आनंदा राजाराम चौगुले, संग्राम विलासराव भोसले व दिलीप आनंदराव ओलेकर, महिला गटातून कासाबाई आत्माराम बसवर व अश्विनी विक्रम कोळेकर, अनुसूचित जाती-जमाती गटातून अशोक अंकुश चंदनशिवे, बिगर उत्पादक गटातून सरिता रवींद्र गाढवे निवडणूक लढवित होते.

मतमोजणीच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत सगरे गटाचे वर्चस्व कायम राहिल्याने कारखान्यावर पुन्हा एकदा सगरे गटाची सत्ता येणार असल्याचे स्पष्ट झाले. अधिकृत निकालाची घोषणा रात्री उशिरापर्यंत झाली नव्हती. अंतिम निकालाची औपचारिकता बाकी होती.

महांकाली शेतकरी विकास पॅनेलवर विश्वास व्यक्त करून आम्हाला भरघोस विजय मिळवून दिल्याबद्दल कारखान्याचे सर्व सभासद, शेतकरी, कामगार, समर्थक आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार. हा विजय कोण्या एका व्यक्तीचा नसून महांकालीच्या सभासदांनी आणि शेतकऱ्यांनी दाखवलेल्या विश्वासाचा विजय आहे. सभासदांनी आमच्यावर सोपवलेली जबाबदारी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडू. कारखान्याची प्रगती, शेतकऱ्यांचे हित आणि कामगारांचे प्रश्न यांना सर्वोच्च प्राधान्य देत काम करू. सभासदांचा विश्वास सार्थ ठरवणे हेच आमचे प्रमुख ध्येय राहील. सर्वांना सोबत घेऊन महांकाली कारखाना लवकरात लवकर पुन्हा सुरू करून तो सक्षम आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू.
- अनिता सगरे, महांकाली शेतकरी विकास पॅनेल
महांकाली सहकारी साखर कारखान्याच्या अत्यंत अटीतटीच्या सत्तासंघर्षात जनसुराज्य पक्षाचे नेते विनय कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली लढा दिला. या लढ्यावर सभासदांनी विश्वास दाखवला. त्यांचा विश्वास आणि त्यांच्या अपेक्षा येणाऱ्या काळात सिद्ध करण्याची जबाबदारी आम्ही सक्षमपणे पार पाडू. कारखाना पुन्हा सुरू करून तालुक्याचे चित्र बदलू. कारखान्याच्या माध्यमातून सभासद, शेतकरी तसेच परिसराचे आर्थिक चित्र बदललेले दिसेल.
- समित कदम, नेते, जनसुराज्य पक्ष.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news