सांगली : महांकाली, माणगंगासह सहा संस्थांच्या विक्रीच्या हालचाली

थकबाकी वसुलीसाठी जिल्हा बँकेचे प्रयत्न
Sangli District Bank
सांगली जिल्हा बँकpudhari File Photo
Published on
Updated on

सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकित कर्जासाठी दोन साखर कारखान्यांसह सहा संस्था ताब्यात आहेत. या संस्थांच्या एकूण 264 कोटी रुपये थकबाकी वसुलीसाठी रिझर्व्ह बँकेचा दबाव आहे. त्यामुळे बँक प्रशासनाने वसुलीसाठी या संस्थांची विक्री करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

कवठेमहांकाळ येथील महांकाली आटपाडी येथील माणगंगा हे दोन साखर कारखाने तर डिवाईन फूड्स, प्रतिबिंब, विजया लक्ष्मी, शेतकरी विणकर सोसायटी या चार संस्था थकबाकीदार आहेत. या सर्वांकडे 264 कोटी रुपये थकबाकी आहे. जिल्हा बँकेकडून शेतीसह बिगरशेती संस्थांना कर्जपुरवठा करण्यात येतो. शेती कर्जाची नियमित वसुली होत असली तरी सहकारी संस्थांची कर्जे मोठ्या प्रमाणात थकित आहेत. जिल्हा बँकेने कर्ज वाटप केलेल्या काही सहकारी संस्था अडचणीत आल्याने बंद पडल्या आहेत. त्यांच्याकडील थकित कर्ज वसुलीसाठी बँकेने संस्था सिक्युरिटायझेशन अ‍ॅक्टअंतर्गत त्या ताब्यात घेतल्या. त्यानंतर त्यांचा लिलाव केला, मात्र त्यास प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे बँकेचा एनपीए कमी करण्यासाठी काही संस्था जिल्हा बँकेने खरेदी केल्या, तर काही संस्थांचा ताबा बँकेकडे आहे.

थकबाकीदार बहुतांश संस्था राजकीय लोकांशी संबंधित आहेत. या सर्व संस्था जिल्हा बँकेने 2020 मध्ये ताब्यात घेतलेल्या आहेत. महांकाली साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी अनेकदा चर्चा आणि उपाय शोधले. मात्र त्याला यश आलेले नाही. माणगंगा साखर कारखाना गेल्या वर्षी सुरू केला, मात्र कारखान्यातील यंत्रणाच खराब झाल्यामुळे तोही प्रयत्न असफल झाला. या दोन कारखान्यांकडे 157 कोटींची थकबाकी आहे. याशिवाय डिवाईन फूड्सकडे 36 कोटी, प्रतिबिंबकडे 10 कोटी, विजया लक्ष्मीकडे 12 कोटी तसेच शेतकरी विणकर सोसायटीकडे 49 कोटी रुपयांची थकबाकी आहे. मार्चअखेरपूर्वी एनपीए कमी करण्यासाठी बँकेने वसुलीसाठी आराखडा तयार केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news