

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीत 39 जागा जिंकून भाजप सत्तेच्या उंबरठ्यावर उभा आहे. भाजपचे बहूमत अवघ्या एका जागेने हुकले. काँग्रेसला 18, राष्ट्रवादी (अजित पवार) 16, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 3, तर शिवसेनेला 2 जागा मिळाल्या. शिवसेना उबाठाला खातेही खोलता आले नाही. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली भाजपने विजय मिळवला. त्याचबरोबर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील यांनी विजयासाठी प्रमुख भूमिका बजावली.
या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष असलेले भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढले. राष्ट्रवादीने तर काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आघाडीशी अघोषित समझोता केला होता. शुक्रवार, दि. 16 रोजी मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर भाजपचे नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे नेते आमदार सुहास बाबर यांनी दूरध्वनीवरून एकमेकांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. त्यामुळे महापालिकेत भाजप-शिवसेना युतीची सत्ता येणार, हे स्पष्ट झालेे.
महापालिकेतील सत्तेसाठी भाजप-शिवसेना युतीबाबत वरिष्ठस्तरावरून निर्णय होईल, असे खात्रीशीर सूत्रांनी सांगितले. आत्मविश्वास हरवलेल्या काँग्रेसने या निवडणुकीत 18 जागा जिंकून दूसरे स्थान पटकावले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीनेही 16 जागा जिंकून लक्षवेधी कामगिरी केली.
पराभूत बडे उमेदवार...
माजी आमदार दिनकर पाटील यांचे सांगलीवाडीतील संपूर्ण पॅनेल पराभूत झाले. शेडजी मोहिते, माजी उपमहापौर, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटाचे विजय घाडगे, हणमंतराव पवार, मनोज सरगर, शुभांगी साळुंखे, तर मिरजेतील योगेंद्र थोरात, अनिता वनखंडे, स्वाती पारधी, मालन हुलवान, दिगंबर जाधव, नर्गिस सय्यद, अभिजित हारगे या दिग्गज नगरसेवकांचा पराभव झाला. गीतांजली ढोपे-पाटील, सचिन सावंत-स्नेहल सावंत हेही पराभूत झाले.
सख्खे चुलत भाऊ
स्थायी समितीचे माजी सभापती दिलीप सूर्यवंशी यांच्या घराण्याने आता राजकारणात आपले अस्तित्व सिध्द केले आहे. माजी स्थायी समिती सभापती धीरज सूर्यवंशी, चेतन सूर्यवंशी यांनी विजय मिळवला.
दादा घराणे...आली चौथी पिढी
वसंतदादा घराण्यातील चौथी पिढी हर्षवर्धन पाटील यांच्यारूपाने राजकारणात आली.
पती-पत्नी तिसऱ्यांदा
मिरज प्रभाग पाचमधून काँग्रेसचे संजय मेंढे व बबीता मेंढे हे पती-पत्नी तिसऱ्यांदा विजयी झाले.
सख्खे भाऊ
संदीप आवटी आणि निरंजन आवटी यांनी राजकीय अस्तित्व बळकट केले.