Maharashtra Drought List: महाबळेश्वर दुष्काळी, खानापूर मात्र सुकाळी! सरकारी निकषांवर प्रश्नचिन्ह

२६५ दुष्काळी तालुक्यांची यादी जाहीर; पावसाच्या आकडेवारीवरून खानापूरचा दुष्काळी तालुक्यांच्या यादीतून समावेश नाही
Drought
DroughtPudhari
Published on: 
Updated on: 

विजय लाळे

विटा: अहो आश्चर्यम् !! महाराष्ट्रातील महाबळेश्वरला दुष्काळी ठरवत कागदोपत्री निकषांकडे बोट दाखवत खानापूर तालुक्याचा माथ्यावरचा दुष्काळी कलंक अखेरीस सरकारी यंत्रणेने पुसला. शासनाची कागदे रंगवणारी यंत्रणा नेमकी कशी काम करते ? याचा धक्कादायक नमुना महाराष्ट्रात बघायला मिळाला आहे. अनेक दिवसांच्या मागणीनंतर महाराष्ट्र शासनाने आज शनिवारी अखेर २६५ दुष्काळी तालुक्यांची यादी जाहीर केली.

Drought
Sangli News| पाणीपट्टी 'अंदाजे'; वसुलीचे 'मीटर' बंद!

दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ नुसार राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यमापन करून हे तालुके आता दुष्काळी ठरविण्यात आलेले आहेत, असे सरकारने म्हंटले आहे. राज्याच्या कृषी आयुक्तांनी यावर्षीच्या चालू खरीप हंगामाचा आढावा घेऊन राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याचा अहवाल सादर केला. जून ते आज पर्यंत या काळात पडलेला पाऊस व अन्य घटक लक्षात घेऊन पंचनामे केले आणि हा दुष्काळ जाहीर केला. त्यामुळे आता दुष्काळ ग्रस्त भागात विशेष बाब म्हणून उपाय योजना आणि सवलती लागू करण्यात येणार आहेत. त्यामध्ये जमीन महसूलात सूट, पिक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू विजबिलात सूट (७.५ हॉर्सपावर पर्यंत क्षमतेच्या विजपंपाचे वीज बिल अगोदरच माफ करण्यात आले आहे.

त्यावरील वीज पंपांना सदर सूट लागू असेल), शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता आणून जास्तीत जास्त कामे सुरु करणे, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्स देण्यात येणार आहेत. यांत गंम्मत अशी की, या दुष्काळी तालुक्यांच्या यादीत महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस जिथे पडतो त्या महाबळेश्वरचे नाव असल्याने सर्वां च्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच ठाणे, पालघर वगळता रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग, कोल्हापूर, अमरावती, लातूर,गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर सह सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील एकूण २६५ तालुक्यांचा समावेश आहे.

Drought
Sangli News| चव्हाणवाडी येथे बिबट्याचा वावर; परिसरात भीतीचे वातावरण

आता ज्या निकषांवर हे तालुके दुष्काळी म्हणून जाहीर केले आहेत त्यांत संबंधित तालुक्यात किती पाऊस पडतो, त्याचे मोजण्याचे गणित ग्राह्य धरले जाते. हा पाऊस मोजण्यासाठी त्या त्या तालुक्यातील मुख्य ठिकाणी पर्जन्यमापक बसवलेला असतो. त्याचा अहवाल शासनाकडे जातो.त्या नुसार जून ते सप्टेंबर महिन्यात सरासरी ७५ टक्के पेक्षा कमी पाऊस असेल तर दुष्काळ जाहीर करतात. शिवाय दोन पावसा च्या मध्ये किमान २१ दिवसाचा खंड पडला तरी दुष्काळ जाहीर करतात. खानापूर तालुक्यात पर्जन्यमापकानुसार ७८ टक्के पाऊस पडला.

तर दोन पावसामध्ये १७ दिवस खंड पडला , तसेच ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात सलग ११ दिवस पाऊसच पडला नाही,त्यानंतर १२ व्या दिवशी मिली मीटर पाऊस पडला आणि त्या नंतर पुन्हा सलग १७ दिवसांचा खंड पडला आहे. तो शासन निकषांनुसार २१ दिवस पडणे अपेक्षित होते. अर्थात शासनाच्या म्हणण्या नुसार यापुढेही पाऊस मोजला जाणार आहे तसेच इतर निकष तपासण्यात येणार आहेत मात्र जरी ही अंतिम यादी नसली तरीसुद्धा महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण असलेले महाबळेश्वर दुष्काळी ठरतो आणि वर्षानुवर्षे कायमस्वरूपी दुष्काळी असलेला खानापूर तालुका मात्र सुकाळी ठरतो. याबाबत लोकांना मात्र कागदोपत्री निकषांकडे बोट दाखवत का होईना, खानापूरच्या माथ्यावरचा दुष्काळी कलंक पुसला याबद्दल सरकारी यंत्रणेचे आभार मानावेत का संताप व्यक्त करावा या संभ्रमात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news