

सांगली : माधवनगर (ता. मिरज) येथे महाप्रसाद वाटपावेळी ताट घेण्याच्या कारणातून झालेल्या वादातून एकावर चाकूहल्ला करण्यात आला. यामध्ये हर्ष सुरेश खाडे (वय 23, रा. माधवनगर) हा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी त्याचे वडील सुरेश गणपत खाडे यांनी दस्तगीर गडकरी आणि अमीर गडकरी (दोघे रा. माधवनगर, सांगली) यांच्याविरुद्ध पोलिसात फिर्याद दिली आहे.
याबाबत माहिती अशी, माधवनगर येथील शिवतेज कॉलनीमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार, दि. 29 ऑगस्टरोजी हर्ष हा त्या ठिकाणी गेला होता. त्याचवेळी महाप्रसादासाठी संशयित दस्तगीर आणि अमीर हेही त्या ठिकाणी आले होते. त्यावेळी जेवणासाठी प्लेट घेण्याच्या कारणातून त्यांच्यात वाद झाला होता. या वादातून संशयित हे हर्ष याच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत होते.
हर्ष हा शनिवार, दि. 31 ऑगस्टरोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास त्याच्या घराजवळ थांबला होता. त्यावेळी दोघांनी त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला. गालावर आणि मानेवर कोयत्याचा वार बसल्याने हर्ष गंभीर जखमी झाला, असे त्याचे वडील सुरेश खाडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत संजयनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.