

जत शहर : जत तालुक्यातील माडग्याळ परिसरात म्हैसाळ योजनेचे पाणी अवघ्या 12 दिवसांत बंद करण्यात आल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दिनांक 27 मार्च 2026 रोजी कॅनॉलमध्ये पाणी दाखल झाल्याने व्हसपेठ व लकडेवाडीसह परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, अल्पावधीतच पाणीपुरवठा बंद झाल्याने नागरिक व शेतकरी हताश झाले आहेत. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच चाऱ्याचीही टंचाई निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी यावेळी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
कॅनॉलमधील पाणी बंद झाल्याने ओढ्यांमध्येही पाणी सोडण्यात आलेले नाही. परिणामी माडग्याळ परिसरातील विहिरींची पातळी खाली गेली असून अनेक विहिरी कोरड्या पडू लागल्या आहेत. याचा सर्वाधिक फटका शेतीला बसत आहे. पिकांना पाणी मिळत नसल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, जनावरांनाही या टंचाईचा फटका बसत असून पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याचीही कमतरता निर्माण झाली आहे.
व्हसपेठ तलाव पूर्णपणे आटून तळ गाठला आहे. त्यामुळे माडग्याळ परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावात सहा दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर म्हैसाळ योजनेचे पाणी तातडीने सुरू करावे, अशी मागणी स्थानिक नागरिक व शेतकरी करत आहेत. म्हैसाळ योजना सहायक अभियंता अजिंक्य जाधव म्हणाले, माडग्याळ यात्रेसाठी पाणी सोडण्यात आले होते. आता अनेक भागातून पाणी सोडण्याची मागणी होत आहे. वरून पाणी बंद झाले होते. शेतकऱ्यांनी मागणी केल्यास व पाणीपट्टी भरल्यास पाणी सोडले जाईल.