

कडेगाव शहर : लोकतीर्थ हे फक्त दगड-मातीचे स्मारक नाही. हे दुःखाचे निवारण करणारे, संघर्षाला दिशा देणारे आणि नव्या पिढीला ऊर्जा देणारे प्रेरणा केंद्र आहे. येथे येणार्या प्रत्येकाला नवा उत्साह, नवी शक्ती मिळते. ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांचे हे लोकतीर्थ महाराष्ट्राला सदैव नवसंजीवनी देत राहील, असे प्रतिपादन विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.
वांगी (ता. कडेगाव) येथील सोनहिरा सहकारी साखर कारखाना परिसरात उभारलेल्या लोकतीर्थ स्मारकाच्या वर्षपूर्ती सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विजय वडेट्टीवार बोलत होते. यावेळी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते आमदार सतेज पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार डॉ. विश्वजित कदम, माजी आमदार विक्रम सावंत, विजयमाला कदम, महेंद्र लाड, डॉ. शांताराम कदम, डॉ. अस्मिता कदम-जगताप, सौ. स्वप्नाली विश्वजित कदम आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार वडेट्टीवार म्हणाले, डॉ. पतंगराव कदम हे विकासाचा महामेरू होते. त्यांचे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न अपुरे राहिले. मात्र त्यांच्या पुत्राने पूरकाळ व कोरोनाकाळात दाखवलेले धैर्य कौतुकास्पद आहे. परंपरेतले नेतृत्व टिकवणे कठीण असते, पण डॉ. विश्वजित कदम ते समर्थपणे निभावत आहेत. त्यांच्या नेतृत्वातूनच हे अपुरे स्वप्न पूर्ण होईल, अशी महाराष्ट्राची ठाम अपेक्षा आहे. यावेळी आ. सतेज पाटील म्हणाले, डॉ. पतंगराव कदम साहेब हे स्वकर्तृत्वातून राज्याच्या राजकारणात ठसा उमटवणारे, हजारो लोकहितकारी निर्णय घेणारे जननायक होते. त्यांचे कार्य पुढील शंभर वर्षे विसरता येणार नाही. ‘डॉ. पतंगराव कदम यांच्यानंतर काय?’ या प्रश्नाचे उत्तर विश्वजित यांच्यारूपाने मिळाले असून त्यांचे नेतृत्व मोठे करणे हीच आपली जबाबदारी आहे. यावेळी खासदार विशाल पाटील, डॉ. जितेश कदम, ज्येष्ठ नेते जे. के. जाधव, विजय होनमाने, उत्तम पवार, सुरेश निर्मळ यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रघुनाथराव कदम, पुण्याचे नगरसेवक रामचंद्र कदम, दिग्विजय कदम, इंद्रजित मोहिते, आदित्य कदम, हर्षवर्धन कदम आदी उपस्थित होते. डॉ. सुरेश सकट यांनी आभार मानले.
डॉ. पतंगराव कदम यांनी आयुष्यभर जनसेवा करीत लोकांच्या सुख-दुःखात सहभागी राहिले. त्यांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले. मीही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत काम करणार आहे. पलूस-कडेगाव मतदारसंघातील प्रत्येक घर हे माझ्यासाठी मतदाराचे घर नाही, तर माझे स्वतःचे कुटुंब आहे. त्यांच्या आनंदात सहभागी होणे, दुःखात खंबीरपणे उभे राहणे, अडचणी सोडवणे हेच माझे कर्तव्य आणि आयुष्यभराचे ध्येय आहे.