

जत : जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात कारवाईसाठी गेलेल्या आरोग्य विभागाच्या पथकाला जत तालुक्यातील उमराणी येथे स्थानिकांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. बोगस डॉक्टरच्या दवाखान्यावर तपासणी सुरू असताना काही ग्रामस्थांनी गोंधळ घालून अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. तसेच वाहनासमोर दगड ठेवून अडथळा निर्माण केल्यामुळे आरोग्य पथकाला कारवाई अर्धवट सोडून परतावे लागले. पोलिसांच्या उपस्थितीत हा प्रकार घडल्याने शासकीय कारवाईत अडथळा आणणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
उमराणी येथे एका 'बंगाली' डॉक्टरने अनधिकृतपणे दवाखाना सुरू करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळत रुग्णांवर उपचार सुरू केल्याची गोपनीय माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमा क्षीरसागर यांनी पोलिसांच्या पथकाला सोबत घेऊन संबंधित दवाखान्यावर छापा टाकला. दवाखान्याची तपासणी व कागदपत्रांचा पंचनामा सुरू असतानाच संबंधित व्यक्तीने काही ग्रामस्थांना सोबत जमवून गोंधळ घातल्याचा आरोप आहे.
तपासणी सुरू असताना जमलेल्या काही जणांनी डॉ. क्षीरसागर यांच्याशी हुज्जत घालून अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शासकीय अधिकाऱ्यांच्या वाहनासमोर दगड ठेवून रस्ता अडविण्यात आला. या प्रकारामुळे घटनास्थळी काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. शासकीय पथकाला कारवाई पूर्ण करण्यात न आल्याने त्यांना परतावे लागले. या मोहिमेत पोलिसांचे पथकही सोबत होते, मात्र गोंधळाच्या वेळी अधिकाऱ्यांना संरक्षण देण्यात पोलिसांना अपयश आल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. पोलिसांसमोरच अधिकाऱ्यांना विरोध होऊन वाहनासमोर अडथळा निर्माण करण्यात आल्याने पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेप्रकरणी जत पोलिस ठाण्यात अद्याप नोंद झाली नसल्याचे समजते.
या प्रकाराबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमा क्षीरसागर म्हणाल्या, उमराणी येथील बोगस डॉक्टरच्या माहितीनुसार कारवाई सुरू केली होती, मात्र काही ग्रामस्थांनी विरोध करत गोंधळ घातला. या संपूर्ण घटनेचा सविस्तर अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात येणार असून, अशा प्रकारच्या विरोधाला न जुमानता बोगस डॉक्टरांविरोधातील मोहीम यापुढेही सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.