

महेश कुलकर्णी
शिराळा शहर : शिराळा तालुक्यात 19 पशुवैद्यकीय दवाखाने व एक फिरता दवाखाना असे 20 दवाखाने आहेत. मात्र यातील 60 टक्के रिक्त पदांमुळे शेतकऱ्यांना खासगी वैद्यकीय सेवेचा आधार घ्यावा लागत आहे. परिणामी त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करून पशुधन वाचवावे लागत आहे. सदरची रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
पशुधन विभागाच्या दवाखान्यातील 64 पैकी 37 पदे रिक्त आहेत. त्यापैकी पशुधन विकास अधिकाऱ्यांची श्रेणी- 1 मध्ये 15 पैकी 7 पदे रिक्त आहेत. परिणामी सहा वर्षांपासून फिरता पशुवैद्यकीय दवाखाना बंद आहे.लाखो रुपये खर्च करून दवाखाने बांधले, पण सक्षम अधिकारी नसल्याने काय करायचे, हा प्रश्न आहे. बेरोजगारीला कंटाळून आता अनेक युवकांनी दूध व्यवसाय सुरू केला आहे. परिणामी पशुधनाच्या संख्येत वाढ झाली. तालुक्यात अडीच लाख पशुधन आहे. मात्र सातत्याने वातावरणातील बदलामुळे जनावरे आजारी पडत आहेत. मात्र त्यांना प्रभावी उपचार सेवा मिळत नाही. याशिवाय विविध रोगांबाबत लसीकरण, प्रबोधन न झाल्याने अनेक जनावरांचा नाहक बळी जात आहे.
पशुधन विकास अधिकारी श्रेणी 1 महत्त्वाची पदे आहेत. कार्यरत 15 जागा, पैकी 7 पदे रिक्त आहेत. याशिवाय पशुधन पर्यवेक्षक 7 पैकी 3 पदे, व्रणेोपचारक 10 पैकी 7 पदे, परिचर 27 पैकी 19 पदे आणि वाहनचालक एक पद रिक्त आहे. एकूण 64 पदे असून पैकी 37 पदे रिक्त आहेत.
गो वर्ग- 26 हजार 496, म्हैस वर्ग - 45 हजार 898
शेळ्या-मेंढ्या - 8741, कुक्कुट 1,57,806, डुकरे - 25 कुत्री - 3198.
पैदासक्षम पशुधन...
देशी गाई... 3533
संकरित गाई... 11793
म्हैस वर्ग.. 31517