

सांगली : उत्पादन शुल्कच्या मिरज विभागाने मिरज-पंढरपूर रोडवरील मिरजेजवळ होत असलेल्या गोवा बनावट मद्याच्या तस्करीवर छापा टाकून सुमारे 5 लाख 80 हजार रुपयांची अवैध दारू पकडली. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून, दोन वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. सोलापूर जिल्ह्यातील एका अड्ड्यावर छापा टाकून तेथील अवैध दारू व इतर साहित्यही जप्त करण्यात आले.
याप्रकरणी सावंता विजय खोत (रा. कोगनोळी ता. कवठेमहांकाळ), आकाश नामदेव खोत, सुनील दादासाहेब खोत (दोघे रा. चाबुकस्वारवाडी ता. मिरज) व बापू मोहन होवाळ (रा. शिरभावी, जि. सोलापूर) या चौघांना अटक करण्यात आली आहे. उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रदीप पोटे यांच्या मार्गदर्शनाखालील मिरज कार्यालयातील पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी मिरज-पंढरपूर रोडवरील मिरजेजवळ छापा टाकून कार (क्र. एमएच 14 जीएस 4209) पकडण्यात आली. कारची तपासणी केली असता त्यामध्ये महसूल चुकवून आयात केलेले विविध प्रकारचे गोवा बनावटीचे 1 लाख 43 हजाराचे विदेशी मद्य सापडले.
या गुन्ह्यामध्ये तीन मोबाईल व वाहनासह एकूण 11 लाख 78 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हे मद्य कोठून आणले याची चौकशी केली असता, सोलापूर जिल्ह्यातील शिरभावी ( ता. सांगोला) येथून हे मद्य आणल्याचे निष्पन्न झाले. या ठिकाणच्या बापू होवाळ याच्या घरावर छापा टाकल्यानंतर तेथे विविध प्रकारच्या विदेशी मद्याचे बाटल्या व त्यांची टोपणे व रिकाम्या बाटल्या मोठ्या प्रमाणात आढळून आल्या. त्याठिकाणी एकूण 4 लाख 37 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या दोन्ही छाप्यांमध्ये चौघांना अटक करण्यात आली. यामध्ये वाहनासह 16 लाख 15 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत निरीक्षक दीपक सुपे, प्रभात सावंत, पंकज कुंभार, बापू चव्हाण, स्वप्निल अटपाडकर, कविता सुपने, शाहीन शेख, स्वप्निल कांबळे आदी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.