

पलूस ः येथील अथर्व संभाजी कुंभार (वय 26) यांना सैनिकी प्रशिक्षण घेत असताना वीरमरण आले. बिहारमधील ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी (गया) येथे प्रशिक्षणादरम्यान त्यांना उष्माघाताचा झटका आला. त्यांना तातडीने वैद्यकीय उपचार देण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.या घटनेमुळे पलूस तालुक्यावर शोककळा पसरली. येथील कुंभार यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. अथर्व यांचे अंतिम दर्शन व अंत्यसंस्कार मंगळवार, 8 जुलैरोजी सकाळी 8.30 वाजता, पलूस येथे होणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व आजी-माजी सैनिक, संघटना, नागरिक व युवकांनी या वीरपुत्रास अंतिम सलाम द्यावा, असे आवाहन सांगली जिल्हा सैनिक परिवार, सैनिक समन्वय समिती व भारतीय माजी सैनिक संघ, सांगली जिल्हा यांनी केले आहे.
अथर्व यांचा जन्म 22 ऑगस्ट 1999 रोजी झाला. त्यांचे शिक्षण किर्लोस्करवाडीतील किर्लोस्कर हायस्कूल येथे झाले. त्यांनी आष्टा येथील अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालय येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. पुढे त्यांनी इन्फोसिस कंपनीत दोन वर्षे सेवा केली. मात्र देशसेवेची प्रबळ ओढ असल्याने त्यांनी आयटी क्षेत्रातील कारकीर्द सोडून थेट सैनिकी भरतीचा धाडसी निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरला. तीन महिन्यांपूर्वी मिलिटरीमध्ये बिहारमधील गया येथील ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमीमध्ये लेफ्टनंट पदासाठी त्यांचे ट्रेनिंग सुरू झाले होते.
या कुंभार कुटुंबीयांकडे पलूस आणि परिसरात खूप आदराने पाहिले जाते. या कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय फॅब्रिकेशन व ट्रॅक्टर-ट्रॉली निर्मितीचा. या कुटुंबातील अथर्व यांना वीरमरण आल्यामुळे या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. त्यांच्यामागे आई, वडील, एक भाऊ, दोन चुलते असा परिवार आहे. आज, मंगळवारी त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या घरापासून मुख्य बाजारपेठेतून जुना बस स्थानक, नवीन बस स्थानकापासून स्मशानभूमीपर्यंत अशी निघणार आहे. स्मशानभूमीत पलूस नगरपरिषदेच्यावतीने अंत्यसंस्काराची सर्व तयारी करण्यात आली आहे.