

इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा
बदलापूरच्या घटनेचे देशभर पडसाद उमटले आहेत. अशा घटना घडू नयेत, यासाठी शाळांनी काळजी घेणे गरजेचे आहे. गुड टच आणि बॅड टच याबाबतची माहिती देत येथील मुक्तांगण प्ले स्कूलच्या चिमुकल्यांचे प्रबोधन करण्यात आले.मुलांना चांगला आणि वाईट स्पर्श समजणे गरजेचे बनले आहे. मुले अशा प्रकारे जागृत झाली तर लहानपणी होत असलेले अत्याचाराचे प्रसंग नक्की टाळता येतील यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. बदलापूरच्या घटनेच्या निमित्ताने पालकांच्या मनात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. लहान मुलांचे मन कोमल आणि नाजूक असते. त्यामुळे त्यांच्या पद्धतीने समजावून देत वेगवेगळ्या प्रसंगांना कसे सामोरे जायचे याबाबत स्कूलच्या संचालिका वर्षाराणी मोहिते यांनी लहान मुलांशी संवाद साधला.
त्या म्हणाल्या, लहान मुलांना खूप प्रश्न पडतात. वयानुसार आपण आपल्या मुलांना माहिती देत राहतो. त्यांच्यावर कोणाची वाईट नजर पडू नये, ते कायम सुरक्षित रहावेत याची पालकांना चिंता सतावत असते. पालक आपल्या मुलांशी गुड टच, बॅड टचबद्दल बोलण्यास टाळतात. याबद्दल आपण त्यांना कशी माहिती द्यावी, याचा विचार करतात. पालक अनेकदा मुलांना स्वतचे सरंक्षण कसे करावे, याची माहिती देतात. समाजात कसे वागावे, गाडीवर कसे बसावे, कोणा अनोळखी व्यक्तीने काही दिले तर खाऊ नये, असे पालक सांगत असतात. पण गुड टच, बॅड टचबद्दल बोलणे टाळतात. मुलांना याबद्दल योग्य वयात माहिती देणे गरजेचे आहे.
बालशिक्षण अभ्यासक सरोजिनी मोहिते म्हणाल्या, अनेकदा लहान मुलांना गुड टच आणि बॅड टचबद्दल माहिती नसते. जर कोणी चुकीच्या ठिकाणी स्पर्श केले तर साहजिक त्यांना भीती वाटेल. मुले या गोष्टी उघडपणे कोणाकडेही व्यक्त करू शकत नाहीत. अशा स्थितीत मुले खचतात. या गोष्टींचा त्यांच्या मानसिकतेवर आणि अभ्यासावरही परिणाम होतो. त्यामुळे मुलांच्या वागण्याकडे पालकांनी नेहमी लक्ष द्यावे.