

शिराळा शहर : शिराळा तालुक्यात बिबट्याची दहशत कायम आहे. बिबट्याकडून वारंवार होणार्या हल्ल्यांमुळे त्याचा नागरी वसाहतीमधील मुक्त वावर कायमचाच झाला आहे आणि अर्थातच दहशतही. बिबट्याच्या हल्ल्यात साधारण 190 पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाला. बिबट्याच्या हल्ल्यामुळे माणसे मृत्युमुखी पडली, काही जायबंदी झाली. किती पाळीव प्राणी मेले याची यादी भलीमोठी होईल. पाळीव प्राणी, थोडीशी शेती यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असतो. बिबट्याने पाळीव प्राणीच मारले, शेतीपिकांचीच हानी केली, तर मग जगायचे कसे ? याचे उत्तर कोण देणार ?
2020 पासून शिराळा तालुक्यात बिबट्याच्या मानवावर हल्ल्याच्या 7 घटना घडल्या आहेत. बिबट्याच्या हल्ल्यात एका मुलाचा मृत्यू झाला, तर एकाचा धडकेने मृत्यू झाला. तडवळे (ता. शिराळा) येथे बिबट्याच्या हल्ल्यात ऊसतोड मजुराचा मुलगा सुफियान शमसुद्दीन शेख (वय 11 महिने) याचा मृत्यू झाला होता, तसेच दुसर्या हल्ल्यात गणेश श्रीराम कंबोलकर जखमी झाले होते. काळुंद्रे (ता. शिराळा) येथील संभाजी बंडू उबाळे यांचा गव्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.
उदगिरी पैकी केदारलिंगवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात मनीषा बाबाजी (रामू) डोईफोडे (वय 10) ही शाळकरी मुलगी ठार झाली होती. शित्तुर येथील शेतकरी पांडुरंग कदम यांचा गव्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. सर्जेराव पाटील (शित्तूर) हे जखमी झाले होते. शिराळा तालुक्यातील मणदूर येथील अंतू संतू पाटील, ज्ञानदेव लाखन, विठ्ठल कुले, बनाबाई कदम (सिद्धेश्वरवाडी), नामदेव मिरुखे, सर्जेराव पाटील, अशोक विष्णू सोनार हे गव्याने केलेल्या हल्ल्यात जखमी झाले होते. पेठ ते शिराळा या राज्य मार्गावर रेठरे धरण तलावाजवळील ओढ्याच्या पूलावर रस्ता ओलांडणार्या बिबट्याची धडक बसल्याने मोटारसायकलस्वार सर्जेराव मारुती खबाले (वय 45, रा. कापरी, ता. शिराळा) यांचा उपचारादरम्यान कराड येथे मृत्यू झाला होता.
शिराळा परिसरात एस. टी. कॉलनी, सुगंधानगर, मोरणा धरण परिसर, पाडळी, पाडळेवाडी, अंत्री, औंढी, भटवाडी, एमआयडीसी परिसर, बेलदारवाडी, गोरक्षनाथ मंदिर परिसर, बाह्यवळण रस्ता. पणुंब्रे, टाकवे, बांबवडे, शिवरवाडी, पाडळी, पाडळीवाडी, खेड, इंग्रूळ, रिळे, मांगले, कांदे, शिंगटेवाडी, भाटशिरगाव.
बिबट्याच्या हल्ल्यात मनुष्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदाराला वन विभागाच्यावतीने 20 लाख रुपयांची भरपाई देण्यात येत होती. आता 25 लाख मिळणार आहेत.
बिबट्याच्या हल्ल्यात अपंगत्व आल्यास पाच लाखांची, गंभीर जखमी झाल्यास एक लाख 25 हजारांची मदत मिळत असे. आता जायबंदी झाल्यास साडेसात लाखांची मदत मिळते.
किरकोळ जखमी असल्यास औषधोपचार करण्याचा खर्च मिळतो. वारसदाराला धनादेश अन् खात्यावर ठेव पावती केली जाते.
मृताच्या जवळच्या वारसदाराच्या नावे भरपाईचा धनादेश देण्यात येतो. तसेच बँक खात्यावर वारसाच्या नावाने ठेव केली जाते.
शिराळ्यातील प्राणिमित्र प्रा. सुशीलकुमार गायकवाड म्हणाले, शेतातील विहिरीला कठडे नसल्याने अनेक वन्यजीव त्यात पडतात आणि त्यांचा जीव धोक्यात येतो. शिराळा, वाळवा तालुक्यात बिबटे, रानडुक्कर, कोल्हा, उदमांजर, नाग, घोणस, धामण, मण्यार असे अनेक वन्य प्राणी विहिरीत पडतात. प्राणिमित्र जीव धोक्यात घालून त्या वन्यप्राण्यांचे जीव वाचवतात. प्राणी निदर्शनास आले नाहीत, तर अनेक वन्यप्राण्यांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे विहिरींना कठडे अथवा संरक्षण जाळी शासनाने सक्तीची करायला हवी.