

ईश्वरपूर : ईश्वरपूर शहरातील दक्षिण भागात सोमवारी सायंकाळी बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सद्गुरू आश्रम शाळेच्या पाठीमागील शेती परिसरात हा बिबट्या फिरताना दिसल्याचे प्रत्यक्षदर्शिनींने सांगितले. शाळेचे रणजित जाधव यांनी स्वतः बिबट्याचे दर्शन झाल्याची पुष्टी दिली आहे.
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ सावधगिरी बाळगत गाड्यांच्या हेडलाईटच्या उजेडात बिबट्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र काही वेळाने बिबट्या शेताच्या दिशेने पसार झाला. त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा बिबट्या मानवी वस्तीत प्रवेश करेल की काय, याची शक्यता नागरिक व्यक्त करत आहेत.
परिसरात लहान मुले व ज्येष्ठ नागरिक संध्याकाळनंतर बाहेर पडण्यास टाळाटाळ करत आहेत. स्थानिकांनी वनविभागाला त्वरित माहिती दिली असून, बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. वनअधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करावी व तत्काळ सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशीही नागरिकांची मागणी आहे.