

शिराळा शहर : गावात बिबट्या शिरला आणि एकच तारांबळ उडाली. सुमारे साडेचार तासाच्या प्रयत्नानंतर या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केले आणि गावकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. शिवरवाडी (ता. शिराळा) या डोंगररांगेतील गावात गुरुवार, (दि. 11) रोजी सकाळी ही घटना घडली.
एका नवीन घरकुलात दीड वर्षाची मादी बिबट्या घुसली होती. ग्रामस्थ आणि वन विभागाच्या पथकाच्या प्रयत्नानंतर या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केले. शिवरवाडी येथे अशोक बेंद्रे यांच्या नवीन घरकुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास अशोक यांचे बंधू नाथा बेंद्रे पाण्याची पाईप आणण्यासाठी घरकुलात गेले असता, त्यांच्यापासून केवळ तीन फुटावर बिबट्या होता. बिबट्याने त्यांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न केला; पण ते बचावले. त्यांनी बाहेर धावत येऊन भाऊ अशोक, सहदेव, पोपट व दगडू बेंद्रे यांना माहिती दिली. ही माहिती वाऱ्यासारखी शिवरवाडी गावात पसरली.
ग्रामस्थांनी तत्काळ घराचे उत्तर व पश्चिमेकडील दरवाजे पत्र्याच्या साहाय्याने बंद केले आणि शिराळा वन विभागाला संपर्क साधला. शिराळा ते शिवरवाडी हे 17 किलोमीटरचे घाटातील अंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी एका तासात पार करून घटनास्थळ गाठले. मोठ्या गलक्यामुळे बिबट्या अधिकच आक्रमक झाला होता आणि त्याचा आवाज सर्वदूर ऐकू येत होता.
उपवनसंरक्षक सागर गवते, सहायक वन संरक्षक नवनाथ कांबळे, वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिल वाजे, वनरक्षक दत्तात्रय शिंदे, स्वाती कोकरे, सह्याद्री रेस्क्यू वॉरिअर्सचे सुशीलकुमार गायकवाड आदींनी घटनास्थळाची पाहणी केली.
पथकाने मुख्य दरवाजाला पिंजरा बसवला. बिबट्या सतत जागा बदलत असल्याने पथकाने घराच्या वर जाऊन पत्रा वाजवून आणि फटाक्यांचा आवाज करून बिबट्याला पिंजऱ्याकडे जाण्यास प्रवृत्त केले. अखेर सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला.
साधनांची कमतरता
वन विभागाकडे अत्याधुनिक साधनसामग्री नसतानाही, कोणतेही भुलीचे इंजेक्शन न देता, केवळ अनुभव आणि कल्पकतेच्या जोरावर बिबट्यास जेरबंद करण्यात विभागास यश आले.
गर्दीचा अडथळा
बिबट्यास पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती आणि तरुणाई मोबाईलवर शूटिंग करण्यात व्यस्त होती. या गलक्यामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण होत होता.
बिबट्यास नैसर्गिक अधिवासात सोडले
बिबट्यास पकडल्यानंतर शिराळा वन विभागाच्या कार्यालयात आणले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मिथुन गुरव यांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडले. यावेळी विराज उद्योग समूहाचे अध्यक्ष विराज नाईक, सरपंच श्रीकांत पाळेकर, उपसरपंच सोपान बेंद्रे, पोलिसपाटील मोहन घागरे आदी उपस्थित होते.
ग्रामस्थांचा संताप
दोन दिवसांपूर्वी बिबट्या वस्तीवर आल्याची माहिती देऊनही दुर्लक्ष केल्याबद्दल ग्रामस्थांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले आणि वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीवर प्रश्न उपस्थित केला.