नेर्ले : माणिकवाडी (ता. वाळवा) येथे मेंढ्यांच्या कळपावर बिबट्याने हल्ला केला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. या हल्ल्यात पशुपालक संदीप महादेव गडाळे यांच्या मालकीच्या एका मेंढ्याचा मृत्यू झाला, तर तीन मेंढ्या जखमी झाल्या.
काशिनाथ रेठरेकर यांचे शेतात संदीप गडाळे यांच्या मेंढ्या बसवल्या होत्या. शुक्रवारी मध्यरात्री बिबट्याने मेंढ्यांच्या कळपावर हल्ला केला. त्यात एका मेंढ्याचा मृत्यू झाला, तर तीन मेंढ्या जखमी झाल्या. गडाळे हे पहाटे शेतात गेल्यावर हा प्रकार उघडकीस आला. सरपंच शिंदे-पाटील म्हणाले, माणिकवाडीसह परिसरात सातत्याने बिबट्याचे दर्शन होत आहे. यामुळे नागरिकांच्यात भीतीचे वातावरण आहे. रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना बिबट्याच्या दहशतीखालीच पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जावे लागते. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस पावले उचलावीत.
बिबट्याच्या हल्ल्याची माहिती वन विभागाला देण्यात आली. वन विभागाच्या अधिकारी अश्विनी वाघमारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.