Leopard Attack: रेठरे धरण येथे बिबट्याची दुचाकीवर झडप

पती-पत्नीसह मुलगी गंभीर जखमी
Leopard Attack |
Leopard Attack: रेठरे धरण येथे बिबट्याची दुचाकीवर झडप(File Photo)
Published on
Updated on

इस्लामपूर : रेठरे धरण (ता. वाळवा) येथे बिबट्याने दुचाकीवर झेप टाकल्याने झालेल्या अपघातात पती, पत्नी व लहान मुलगी गंभीर जखमी झाली. हा अपघात शनिवारी रात्री येथील रामोसकीच्या पुलाजवळ घडला. जखमी शिराळा तालुक्यातील कणदूर येथील असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बिबट्याने दुचाकीला धडक देण्याची पंधरा दिवसातील ही दुसरी घटना आहे.

दुचाकीस्वार विष्णू दादू पाटील (वय 47), त्यांची पत्नी वनिता (वय 39) व मुलगी आयेशा (वय 13, सर्व रा. कणदूर) अशी जखमींची नावे आहेत. या घटनेनंतर वन विभागाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी पाहणी केली.

याबाबत माहिती अशी, कणदूर येथील विष्णू पाटील हे पत्नी व मुलीसह दुचाकीवरून रेठरे धरण येथील नातेवाईकाकडे निघाले होते. येथील इकबाल संदे यांच्या वस्तीजवळील छोट्या पुलाजवळ ते आले असता विजय रामचंद्र जोशी यांच्या शेतातून बिबट्याने उत्तर बाजूकडून दक्षिण बाजूकडे रस्ता ओलांडण्यासाठी झेप टाकली. अचानक बिबट्या दुचाकीच्या पुढच्या चाकाला धडकल्याने दुचाकी घसरून तिघेही रस्त्यावर पडून जखमी झाले.

घटना प्रत्यक्ष पाहणारे ग्रामविकास अधिकारी विकास वनारे, विकास पाटील (तासगाव) यांनी जखमींना तत्काळ आपल्या वाहनातून रेठरे धरण येथे खासगी रुग्णालयात दाखल केले. विष्णू पाटील यांच्या कपाळावर जखम झाली असून, डाव्या हाताला, पायाला व बरगड्यांना गंभीर दुखापत झाली आहे, त्यांच्या पत्नी वनिता यांच्या कपाळावर, ओठावर व नाकाला जखम झाली आहे, तर मुलगी आयेशा हिच्या ओठाला, कपाळावर व दोन्ही पायांच्या गुडघ्यांना दुखापत झाली आहे.

बिबट्याच्या धडकेनंतर वनिता पाटील या घाबरून गेल्या होत्या. येथील वनरक्षक शहाजी पाटील, विलास कदम, पांडुरंग उगळे यांनी जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली. प्राथमिक उपचारानंतर सर्व जखमींना इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पंधरवड्यापूर्वी आष्टा येथे दुचाकीस्वारांवर झडप

सहा महिन्यांपूर्वीही रेठरे धरण येथील इरिगेशन पुलाजवळ बिबट्याने गाडीवर झडप घेतल्याने कापरी येथील दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता. पंधरा दिवसापूर्वी आष्टा येथेही बिबट्याने दुचाकीवर झडप टाकल्याने दोघे गंभीर जखमी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news