Leopard attack : बिबट्यांचं करायचं काय?

12 वर्षांच्या मुलासह तिघे जखमी : बिबट्याचे दुचाकीस्वारांवर हल्ले : नायकलवाडी परिसरात घटना
Leopard attack
Leopard attackPudhari
Published on
Updated on

सांगली जिल्ह्यात बिबट्यांचे हल्ले वाढतच आहे. जिल्ह्यातील काही भागात विशेषतः वाळवा, शिराळा तालुक्यांमध्ये बिबट्या हमखास दिसतो आहे. डोंगर परिसर तसेच ऊस शेतीच्या परिसरात तर बिबट्या, त्याची पिले दिसणे नित्याचेच झाले आहे. बिबट्यांचे पाळीव जनावरांवर होणारे हल्ले पशुधनाची मोठी हानी करत आहेत. केवळ पशुधनच नव्हे, तर माणसांवरील हल्लेही चिंता वाढवत आहेत. बिबट्यांची वाढती संख्या, त्यांचे हल्ले, माणसांचे, पशुधनाचे नुकसान, निद्रिस्त शासन आणि प्रशासन, आत्ममुग्ध राजकारणी या पार्श्वभूमीवर, बिबट्यांचं काय करायचं..? हा प्रश्न त्यांची दहशत वाढविणाराच ठरतो आहे.

ईश्वरपूर ः नायकलवाडी (ता. वाळवा) परिसरात बिबट्याने शुक्रवारी रात्री अक्षरशः धुडगूस घातला. दुचाकीस्वारांचा पाठलाग करून त्यांच्यावर हल्ले चढवले. शुक्रवारी रात्री घडलेल्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये 12 वर्षांच्या मुलासह तिघे जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात कमालीची दहशत पसरली असून वन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या हल्ल्यात विलास रघुनाथ पाटील (वय 40), त्यांचा मुलगा राजवीर विलास पाटील (वय 12, रा. करमाळे, ता. शिराळा) आणि प्रकाश कृष्णात गावडे (वय 27, रा. ओझर्डे, ता. वाळवा) हे जखमी झाले आहेत.

शुक्रवारी रात्री 8 च्या सुमारास विलास पाटील आपल्या मुलासह पेठ येथील यात्रेतून करमाळेकडे दुचाकीवरून निघाले होते. नायकलवाडीजवळ उसाच्या शेतातून अचानक बिबट्याने त्यांच्यावर झेप घेतली. बिबट्याचे दात विलास यांच्या पायात खोलवर घुसले, तर मागे बसलेल्या राजवीरच्या पायाचाही बिबट्याने चावा घेतला.

दुसऱ्या घटनेमध्ये याच परिसरातून दुचाकीवरून ओझर्डेला निघालेले प्रकाश गावडे यांच्या दुचाकीवरही बिबट्याने हल्ला केला. यात त्यांच्या डाव्या पायाला गंभीर जखम झाली आहे. याशिवाय नायकलवाडीचे अस्लम जमादार हे दुचाकीवरून जात असताना बिबट्याने त्यांच्यावरही झेप घेतली; मात्र दुचाकीच्या फायबरचा भाग तुटून मोठा आवाज झाल्याने बिबट्या बाजूच्या उसाच्या शेतात पळून गेला आणि जमादार थोडक्यात बचावले.

शिराळ्यात नागकट्टा परिसरात वावर

येथील नवजीवन वसाहत, नागकट्टा तसेच अंबामाता मंदिराच्या मागील परिसरात गेल्या तीन-चार दिवसांपासून बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शनिवारी रात्री 8 ते 8.30 वाजण्याच्या दरम्यान काही युवकांना बिबट्याची चाहूल लागली. त्यांनी टॉर्चच्या प्रकाशात पाहिले असता बिबट्या दिसला. काही तरुणांनी त्याचे चित्रीकरणही केले. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, बिबट्याने परिसरातील काही पाळीव प्राण्यांची शिकार केली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

विशेषतः नागकट्टा परिसरात लहान मुले नियमितपणे खेळत असतात. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. या परिसरात तत्काळ पाहणी करून सापळा लावून बिबट्याला सुरक्षितरीत्या जेरबंद करावे, तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना त्वरित राबवाव्यात, अशी मागणी नवजीवन वसाहत परिसरातील नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे. दरम्यान, नागरिकांनी रात्री उशिरा घराबाहेर पडू नये, लहान मुलांवर लक्ष ठेवावे, संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित वन विभाग अथवा पोलिस प्रशासनाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दुचाकीस्वारांवरील हल्ल्यांचे सत्र सुरूच

परिसरात बिबट्याने दुचाकीस्वारांना लक्ष्य करण्याचे सत्र सुरूच ठेवल्याने दहशतीचे वातवरण आहे. रेठरे धरण येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यात अपघात होऊन एक महिला गंभीर जखमी झाली होती. महादेववाडी रस्ता परिसरात महिन्याभरापूर्वी झालेल्या हल्ल्यात चौघे जखमी झाले होते. यानंतर नायकलवाडी येथे आता हल्ल्यात पुन्हा तिघे जखमी झाले आहेत. वारंवार होणाऱ्या या हल्ल्यांमुळे शेतकरी व प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तातडीने पिंजरा लावण्याची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news