शिराळा शहर : उपवळे (ता. शिराळा) येथे गावातील हनुमान मंदिराच्याजवळ राहणाऱ्या नऊ वर्षीय बालिकेवर बिबट्याने हल्ला करून जखमी केले. अकरा वर्षांच्या भावाने तिला बिबट्याच्या तावडीतून सोडविल्याने या बालिकेचा प्राण वाचला. स्वरांजली संग्राम पाटील (वय 9) असे जखमी बालिकेचे नाव आहे. तिच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना बुधवारी (दि. 7 ) रात्री घडली.
जेवण झाल्यावर शेजारच्या घरात जाण्यासाठी शिवम व स्वरांजली हातात हात धरून निघाले होते. यावेळी अचानक बिबट्या आला व त्याने स्वरांजलीच्या नरड्यास पकडले. यावेळी शिवम याने स्वरांजलीचा हात सुटल्यावर त्याने स्वरांजलीचा पाय पकडला. बिबट्याने तिच्या मानेला पकडले, मात्र डोक्यावरील टोपीमुळे त्याचे दात पूर्ण आत गेले नाहीत. तसेच शिवमने पाय धरून ओढल्याने बिबट्याची पकड ढिली झाली. याचवेळी त्यांची आई स्वप्नाली याही बाहेर आल्या. त्यांनीही आरडाओरडा केली. त्यामुळे घरातील व नागरिक मदतीसाठी धावले. यामुळे बिबट्या पळून गेला.
बिबट्याच्या हल्ल्यात स्वरांजलीच्या हातावर, मानेवर, पाठीवर जखमा झाल्या आहेत. जखमी स्वरांजलीला तातडीने शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वनपाल अनिल वाजे, वनरक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दवाखान्यात धाव घेतली.