

मिरज/आरग : आरग (ता. मिरज) येथे नवीन घेतलेली मोटार शिकताना चालक मोटारीसह थेट विहिरीत पडला. स्वप्निल कामेरी (वय 25, रा. शिंदेवाडी, ता. मिरज) असे त्याचे नाव आहे. त्याला विहिरीबाहेर काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
स्वप्निल कामेरी हा आरग येथील एकाकडे कामाला होता. त्याच्या मालकाने गेल्या आठवड्यामध्ये नवी मोटार घेतली होती. स्वप्निल हा शिकण्यासाठी मालकाची मोटार घेऊन सोमवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास बाहेर पडला होता. काही अंतरावर गेल्यानंतर स्वप्निल याचा नव्या मोटारीवरील ताबा सुटला. त्यामुळे मोटारीसह स्वप्निल थेट विहिरीत पडला. या ठिकाणी असणार्या काही प्रत्यक्षदर्शी महिलांनी ही घटना मालकास सांगितली. तत्काळ मिरज ग्रामीण पोलिस आणि रेस्क्यू फोर्सला माहिती देण्यात आली. चालकास आणि मोटार बाहेर काढण्यासाठी रात्री उशिरापर्यंत शर्थीचे प्रयत्न सुरू होते. पडकी विहीर, त्यात झाडे-झुडुपे असल्याने मदतकार्यात अडथळे निर्माण होत होते. रात्री उशिरापर्यंत विहिरीतील पाणी बाहेर काढण्याचे काम सुरू होते.