

शिराळा : शिराळा डोंगरी तालुक्यातील कोकणेवाडी, भाष्टेवस्ती, धामणकर वस्ती, मिरुखेवाडी या डोंगरकपारीतील गावांना भूस्खलन व दरड कोसळण्याचा धोका आहे. या गावांतील लोकांचे कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रस्ताव शासनदरबारी धूळ खात पडून आहे.
दरवर्षी पावसाळ्यात पाण्याचे उमाळे घरा-घरात लागतात. डोंगरांना भेगा पडतात. यंदाही दरड कोसळण्याचा व भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. जीव धोक्यात घालून लोक राहत आहेत. फोनची सुविधा नाही. पावसाळ्यात वीज नसते. रस्ता नाही. या गावांतील नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याची मागणी होत असून फक्त सर्व्हे करून प्रस्ताव पाठवला आहे.
स्थलांतरित कुटुंबांची संख्या : कोकणेवाडी 101 कुटुंबे (278 ग्रामस्थ), भाष्टेवस्ती 30 कुटुंबे (49), धामणकरवस्ती 26 (80) कुटुंबे (26), मिरुखेवाडी 131 कुटुंबे (209), अशी एकूण 288 कुटुंबे. डफळेवाडीतील (26) कुटुंबे असून (106) लोक आहेत. या लोकांना गेल्यावर्षी गाव सोडून खाली आणण्यात आले होते.
गावकर्यांना सूचना : सदर गावांना तहसीलदार शामला-खोत, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, शिवाजीराव नाईक, आमदार सत्यजित देशमुख, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी भेटी देऊन सूचना दिल्या आहेत.
स्थलांतराची गरज का? : या वाड्यांतील डोंगरांना भेगा पडल्या आहेत. घरात पाण्याचे उमाळे सतत लागत आहेत. मोठ्या दुर्घटनेची शक्यता असल्याने स्थलांतराची गरज आहे.
सोय गरजेची : संभाव्य अतिवृष्टीचा विचार करून स्थलांतरित नागरिकांना जीवनावश्यक वस्तू, आरोग्य सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. ग्रामसेवक, तलाठी तसेच आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य यांनी या गावांमध्ये थांबणे, तहसील कार्यालयात चोवीस तास आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष सुरू करणे, यासाठी संपर्क अधिकारी, गावकर्यांना लाईफ जॅकेट, रिंग, रोप, बॅग्ज, मेगाफोन, बॅटरी आदी साहित्य उपलब्ध करून देणे, तालुक्यातील स्वयंसेवी संस्था, शोध व सुटका पथक यांची माहिती संकलित करणे, प्रशिक्षण व माहिती देणे, गावनिहाय आराखडे तयार करणे.
तालुक्यातील आपत्तीप्रवण मिरुखेवाडी, भाष्टेवस्ती, धामणकर वस्ती, कोकणेवाडी या गावांच्या पुनर्वसनाचा ले आऊट करून नगररचना विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. नागपूर येथील दूरसंवेदन उपयोजना केंद्राकडून नकाशा मागविण्यात आला आहे. गट नंबरचा सर्व्हे, रेखांकन केले आहे. प्रस्तावित जागा निश्चित करण्यात आली आहे. भूस्खलनाचा धोका निर्माण झालेल्या भाष्टेवस्तीचे स्थलांतर बेरडेवाडी येथे, तर मिरुखेवाडीचे स्थलांतर मणदूर येथे, धामणकर वस्तीचे आरळा, तर कोकणेवाडीचे बेरडेवाडी येथे स्थलांतर करायचे आहे.