

चिपळूण : मागील चार दिवासांपासून येथे सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाशिष्ठीसह शिवनदी देखील दुथडी भरून वाहत आहे. सोमवारी देखील येथे वाशिष्ठी नदीपात्राबाहेर बाजारपूल परिसरात पाणी आल्याने शहरातील काही शाळांमधील विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली. तसेच प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची परीक्षा देखील रद्द करण्यात आली. दिवसभर पावसाची संततधार सुरू राहिल्याने वाशिष्ठीच्या पाणी पातळीवर प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात आले होते. कुंभार्ली घाटातील वळणावर सायंकाळी दरड कोसळण्याची घडना घडली, मात्र काही वेळातच ती हटवण्यात आल्याने वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला नाही.
बाजारपूल परिसरात 5 मिटरवर असलेली इशारा पातळी नदीने ओलांडलेली नाही. साधारण 4.80 मिटरपर्यंत पाण्याची पातळी गेली होती. शहरातील पेठमाप, मुरादपूर, उक्ताड, जुना कालभैरव मंदिर परिसर यासारख्या सखल भागात पाणी साचले होते. मात्र दुपारनंतर ओहोटी सुरू होताच पाण्याची पातळी कमी झाली. परंतु, सायंकाळ नंतरही पावसाचा जोर कायम होता. या संपुर्ण परिस्थितीवर प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात आले होते. प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्याकडून सतत वाशिष्ठी व शिवनदीची पाणी पातळी तसेच कोळकेवाडी धरणाची पाणी पातळी व विजनिर्मीती नंतर सोडण्यात येणारे अवजल याबाबतची माहिती नागरिकांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून वेळोवेळी दिली जात होती.