

कुरळप : कार्वे (ता. वाळवा) येथून अंगणात खेळणाऱ्या पाच वर्षांच्या चिमुकलीला बिबट्याने उचलून नेल्याची खळबळजनक घटना अखेर खोटी ठरली. सदर मुलीचे अपहरण अज्ञात इसमाने फूस लावून केल्याचे उघड झाले आहे. या घटनेचे गूढ उलगडत कुरळप पोलिसांनी कराड येथून मुलीला सुखरूप ताब्यात घेतले.
अपहृत मुलीचे नाव आर्यन्सी प्रकाश चव्हाण (वय 5) असून, ती मूळची तळाशी (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथील रहिवासी असून, सध्या कार्वे (ता. वाळवा) येथे वास्तव्यास होती. याप्रकरणी मुलीचे आजोबा कृष्णात शंकर पाटील यांनी कुरळप पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात फिर्याद दाखल केली आहे. रविवारी संध्याकाळी चिमुकली आर्यन्सी ही अंगणात खेळत असताना अचानक गायब झाल्याचे लक्षात आले. त्या भागात बिबट्याचा वावर असल्यामुळे बिबट्यानेच मुलीला उचलून नेल्याची भीती व्यक्त करण्यात आली.
कराडमध्ये मिळाला धागा...
दरम्यान, कुरळप पोलिसांना आर्यन्सी कराड परिसरात असल्याचा ठोस सुगावा लागला. तातडीने पथक रवाना करून एका हॉटेलच्या शेजारी सदर मुलीला सुखरूप ताब्यात घेण्यात आले.