

कुपवाड : बामणोली (ता. मिरज) येथील राजू बाबासाहेब वाघमोडे (रा. दत्तनगर) यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला व घरातील सोन्याचे दागिने व रोख रकमेसह 5 लाख 18 हजार रुपयांची चोरी केली होती. पोलिसांनी काही तासातच संशयिताचा शोध घेऊन त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेऊन अटक केली. रवींद्र बाबासाहेब बिचुकले (वय 36, रा. दत्तनगर, बामणोली) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
फिर्यादी राजू वाघमोडे हे सोमवार दि. 9 रोजी दुपारी पत्नीसह कुपवाड पोलिस ठाण्यात काही कामानिमित्त गेले होते. काम संपल्यावर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दोघेही पती-पत्नी घरी आल्यावर त्यांना दरवाजाचे कुलूप तोडून टाकल्याचे दिसले. कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम अशी एकूण 5 लाख 18 हजार रुपयांची चोरी झाल्याचे दिसून आले. सहायक पोलिस निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी तातडीने ठसेतज्ञ व श्वानपथकाला पाचारण केले.
पोलिसांचे एक पथक तातडीने रवाना करून संशयिताचा शोध घेतला व संशयित रवींद्र बिचुकले यास ताब्यात घेतले. त्याला कुपवाड पोलिस ठाण्यात आणून चौकशी केली असता, संशयित बिचुकले याने चोरीची कबुली पोलिसांना दिली.