

कुपवाड : कुपवाड ते कानडवाडी जुन्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. जागोजागी खड्डे पडले आहेत. वाहन चालकांना खड्ड्यांतून वाहने घेऊन जाताना मणक्याचे आजार होऊ लागले आहेत. तसेच काही वेळा लहान-मोठे अपघात होत आहेत. महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. महापालिका प्रशासनाने सदर रस्त्याचे डांबरीकरण करावे अशी मागणी होत आहे.
कुपवाड शहरातून कुपवाड एमआयडीसी व पुढे कानडवाडी, मानमोडी, तासगाव तसेच वॉर्ड नंबर दोनमधील बजरंगनगर, शरदनगर आदी उपनगरात ये जा करणार्या वाहनांची संख्याही जास्त आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करावे अशी मागणी नागरिकांनी वेळोवेळी महापालिका प्रशासनाकडे करूनही प्रशासनाने नागरिकांच्या मागणीला केराची टोपली दाखविली आहे.
कुपवाड, बामणोली औद्योगिक वसाहत व कानडवाडी भागातील विविध कारखान्यांत कामावर ये जा करणारे कामगार याच रस्त्याचा वापर करतात. रात्री कामावर ये जा करताना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने दुचाकी घसरून अपघात होत आहेत. या अपघातांत काही कामगार जखमी झाले आहेत, तर वाहनांचेही नुकसान होत आहे. खड्डे चुकवित असताना अपघात होत आहेत. महापालिका प्रशासनाने कुपवाड ते कानडवाडी या जुन्या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे.