

कुपवाड : कानडवाडी (ता. मिरज) येथील कायझन इंजिनिअर्स या कंपनीत तयार केलेला इंडस्ट्रियल बॉयलर वाहून नेणाऱ्या क्रेनचा रस्त्यावरील उच्चदाब वीजवाहिनीला अचानक स्पर्श झाल्याने क्रेन चालकासह दोघांचा विजेच्या तीव्र धक्क्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना कुपवाड एमआयडीसीतील मेनन पिस्टन चौकात बुधवार, दि. १९ रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली.
प्रदीप दिलीप खराडे (वय ४१, रा. यशवंतनगर, कुपवाड) आणि रोहिदास भगवान उत्तरे (३२, रा. शिवशक्तीनगर, कुपवाड) अशी मृतांची नावे आहेत. बॉयलर मिरज एमआयडीसीकडे नेण्याचे काम सुरू होते. यासाठी दोन क्रेनचा वापर केला जात होता. बुधवारी मध्यरात्री हे बॉयलर कुपवाड एमआयडीसीतील मेनन पिस्टन चौकातून जात असताना एका क्रेनच्या वरच्या भागाचा रस्त्यावरील उच्चदाब वीजवाहिनीच्या तारांना स्पर्श झाला. दोघांनाही विजेचा तीव्र धक्का बसल्याने ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर दोघांनाही तातडीने मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.