कुपवाड : कुपवाड ते मिरज रस्त्यालगत असलेल्या एका शेतात सोडलेले केमिकलमिश्रित पाणी पिल्याने 6 मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. या दुर्घटनेत अंदाजे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे संबंधित मेंढपाळाने सांगितले.
सोमराया तुकाराम पुजारी (वय 30, रा. अक्कोळ, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) हे मेंढपाळ गुरुवारी दुपारी 250 मेंढ्यांचा कळप घेऊन कुपवाड शहरातून मिरजमार्गे कर्नाटकात जात होते. मिरज एमआयडीसीलगत असलेल्या एका शेतात सदर मेंढ्यांचा कळप चरायला गेला होता. एका शेतातील चरीत साचलेले केमिकलमिश्रित पाणी सहा मेंढ्यांनी पिल्याने त्यांचा जागीच तडफडून मृत्यू झाला. या घटनेत मेंढपाळाचे आर्थिक नुकसान झाले आहे. दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
प्रदूषण नियंत्रण अधिकारी तसेच पशुवैद्यकीय विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. प्रदूषण अधिकाऱ्यांनी पाण्याचे नमुने घेतले आहेत. तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत मेंढ्यांचे जागेवरच शवविच्छेदन केले. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट व्हावे, यासाठी शरीरातील नमुने ताब्यात घेण्यात आले आहेत. सखोल निदानासाठी हे सर्व नमुने तातडीने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. पुणे प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच या मेंढ्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे. घटनास्थळी बघ्यांनी प्रचंड गर्दी केली होती.
दरम्यान, मेंढपाळाच्या नुकसानीला जबाबदार कोण? मेंढपाळाची नुकसान भरपाई द्यावी, पाणी सोडणाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.