

कवठेमहांकाळ : कुकटोळी (ता. कवठेमहांकाळ) येथे उसने पैसे परत मागितल्याने दोघांनी एकाच्या डोक्यात दगड घातला. रविवार, दि. 18 रोजी ही घटना घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अजित ऊर्फ संजय कृष्णा क्षीरसागर (वय 45, रा. कुकटोळी) यांचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने कुकटोळी परिसरात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक जोतिराम पाटील व त्यांच्या पथकाने अवघ्या चार तासात दोघा संशयितांना अटक केली. स्वप्निल तानाजी क्षीरसागर (28) व सुशांत शंकर शेजूळ (22, दोघेही रा. कुकटोळी) अशी संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अजित क्षीरसागर यांनी संशयित स्वप्निल क्षीरसागर याला दोन हजार रुपये उसने दिले होते. हे पैसे मागण्यासाठी अजित यांनी रविवारी रात्री स्वप्निल व सुशांत यांना हायस्कूलच्या पाठीमागे बोलावले होते. तिथे त्यांच्यात वादावादी झाली. यावेळी रागाच्या भरात स्वप्निलने अजित यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
यामध्ये अजित खाली पडले. यावेळी सुशांतने अजित यांच्या डोक्यात दगड घातला. स्वप्निलनेही तेथील दगड घेऊन अजित यांच्या पायावर मारला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. जखमी अजित यांना तातडीने मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचार सुरू असताना सोमवारी त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत मृत अजित यांची पत्नी सीमा क्षीरसागर यांनी संशयित स्वप्निल व सुशांत यांच्याविरोधात कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खुनाची माहिती समजताच पोलिस उपअधीक्षक सुनील साळुंखे यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या.
रविवारी रात्री अजित क्षीरसागर यांना मारहाण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक जोतिराम पाटील व पथकातील नागेश मासाळ, श्रीमंत करे, निवृत्ती करांडे, अभिजित कासार यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. अवघ्या चार तासात संशयित स्वप्निल व सुशांत यांना ताब्यात घेतले.