

सांगली : कुची (ता. कवठेमहांकाळ) येथील घरफोडीचा छडा लावण्यात सांगली गुन्हे अन्वेषणला यश आले. या चोरीप्रकरणी प्रवीण विठ्ठल निकम (वय 32, रा. कुची) याला अटक केली. त्याच्याकडून चोरीतील 7 लाख 80 हजार रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले.
फिर्यादी सुरेखा पाटील या कुचीमध्ये राहण्यास आहेत. त्या दि. 8 रोजी बाहेरगावी गेल्या होत्या. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. सुरेखा पाटील या गावी गेल्याची माहिती प्रवीण निकम याला होती. त्यामुळे तो त्यांच्या घरावर पाळत ठेवून होता. मध्यरात्री त्याने सुरेखा पाटील यांचे घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर सोन्याचे गंठण, मिनी गंठण, लक्ष्मीहार, अंगठी, चांदीची पणती, मेखला, जोडवी असा मुद्देमाल चोरून नेला होता.
या चोरीचा छडा लावण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारावकर, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार सहायक निरीक्षक पंकज पवार, हवालदार संदीप नलवडे, सोमनाथ गुंडे, अमिरशहा फकीर यांचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी कुची येथे घरफोडी केलेला संशयित तानंग फाटा (ता. मिरज) येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तेथे छापा टाकून त्यास अटक केली. त्याच्याकडून चोरीतील दागिने जप्त करण्यात आले. त्याला कवठेमहांकाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.