

जत : जत उपविभागीय कृषी कार्यालयाला रात्री गस्त घालणाऱ्या पहारेकऱ्यावर पाच अज्ञात चोरट्यांनी तलवारहल्ला केला. बाळू लक्ष्मण मोरे (वय 55, रा. मुचंडी, ता. जत) असे जखमी पहारेकऱ्याचे नाव आहे. ही घटना शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली.
चोरट्यांनी मोरे यांच्याकडील मोबाईल, गळ्यातील चेन व अंगठी लंपास केली. तसेच गळ्याला फास लावण्याचा प्रयत्न केला. मोरे यांच्यावर मिरज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्री उशिरापर्यंत जत पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
उपविभागीय कृषी कार्यालयात शिपाई-पहारेकरी म्हणून बाळू मोरे काम करतात. शुक्रवारी रात्री त्यांची रात्रपाळी होती. त्यामुळे ते कार्यालयाच्या आवारात पहाटे गस्त घालत होते. दरम्यान तीन वाजण्याच्या सुमारास पाच तरुणांनी तोंडाला काळे कापड बांधून कार्यालयाच्या आवारात प्रवेश केला. उपविभागीय कार्यालयाकडे जाणाऱ्या तरुणांना मोरे यांनी हटकले असता त्यांनी हिंदीमध्ये संभाषण करत ‘उसको पकड’ असे म्हणत त्यांच्यावर तलवारीने दोन वार केले. तसेच हाताने ठोसे लगावत मारहाण केली. त्याचबरोबर गळ्याला फास लावण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, एकाने लोखंडी गजाने डोक्यात प्रहार केल्याने मोरे बेशुद्ध पडले. ते मृत झाल्याचा समज झाल्याने हल्लेखोरांनी ,पलायन केले. दरम्यान पहाटे पाच वाजता मोरे शुद्धीवर आले. त्यांनी परिसरातील एका घराजवळ जाऊन मदत मागितली. कृषी विभागातील कृषी सहायक पुजारी यांच्या मदतीने एका खासगी रुग्णालयात तात्पुरते उपचार करून त्यांना मिरज येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.