

बोरगाव : गेल्या आठवड्यात कृष्णा नदीला पूर आला होता. नदीकाठच्या जमिनीवरील पाणी सध्या पात्रात गेले आहे. मात्र मळीच्या जमिनी नदीपात्रात ढासळू लागल्या आहेत. त्यामुळे काठावरील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
गेल्या आठवड्यात झालेली पावसाची संततधार व धरणातील पाण्याचा विसर्ग, यामुळे कृष्णा नदीला पूर आला. पुरामुळे नदीकाठच्या अनेक गावांत व परिसरातील शेतात पाणी जाऊन घरांचे, पिकांचे नुकसान झाले. नदीकाठावरील शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. सध्या पाणी पुन्हा नदीपात्रात गेले आहे. पाणी नदीपात्रात गेल्यानंतर नदीकाठावरील मळी भागातील जमिनी वाफसा होईल तशा निसटून नदीपात्रात जाऊ लागल्या आहेत. बोरगाव येथील ब्रह्मानंद महाराज मठाच्या पश्चिम बाजूस असलेली मळी, रेठरेहरणाक्ष बाजूकडील देसाई मळी, ताकारी पुलाशेजारील बनेवाडी व गौंडवाडी बाजूकडील मळीचा भाग निसटून नदीपात्रात गेला आहे.