

सांगली : अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास कर्नाटक शासनास परवानगी देऊ नये, अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय जलसंपत्ती मंत्र्यांना पाठवले आहे. खूप उशिरा का होईना, मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवण्याचे धाडस केले, याबद्दल त्यांचे अभिनंदन. मात्र केवळ पत्र पाठवून चालणार नाही, त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला पाहिजे, असे निवेदन कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीने प्रसिद्ध केले आहे.
समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील, मार्गदर्शक निवृत्त अभियंता प्रभाकर केंगार यांनी निवेदनात म्हटले आहे की, कृष्णा महापूर नियंत्रण कृती समिती तसेच अंकुश आंदोलन, या संघटनांच्या सततच्या आंदोलनामुळे आणि पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्र्यांना केंद्रीय मंत्र्यांना पत्र पाठवावे असे वाटले, हीच मोठी गोष्ट आहे. यापूर्वीच राज्य सरकारने केंद्राकडे अलमट्टीची उंचीवाढ तसेच कर्नाटक सरकारचा अलमट्टी धरणाबाबतचा व्यवहार, याबद्दल तक्रार करणे गरजेचे होते. परंतु आता मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय जलसंपदामंत्री सी. आर. पाटील यांना पत्र पाठवले, हेही नसे थोडके.
पण केवळ पत्र पाठवून चालणार नाही. कारण यापूर्वीही कर्नाटकबरोबर खूप पत्रव्यवहार झाला आहे. अर्ज, विनंत्या केल्या आहेत. परंतु त्यांची भूमिका एकूणच आडमुठेपणाची असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अलमट्टी धरणाची उंची बिलकुल वाढवता कामा नये, असा आग्रह केंद्र सरकारकडे धरला पाहिजे. त्यासाठी केंद्र सरकारने दोन्ही राज्यांची संयुक्त बैठक तातडीने बोलवण्याची गरज आहे.