कुंडल : पुढारी वृत्तसेवा
दिल्ली येथे क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ, नवी दिल्ली यांचा उक्तृष्ट ऊस विकास संवर्धनाचा देशपातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी क्रांती उद्योग समूहाचे प्रमुख आमदार अरुण लाड, कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
यावेळी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते. देशातील सर्व 260 सहकारी साखर कारखाने व नऊ राज्यांतील साखर संघ सदस्य असलेल्या कारखाना महासंघ या शिखर संस्थेमार्फत दरवर्षी देशातील सहकारी साखर कारखान्यांचे मूल्यांकन करण्यात येते. त्याआधारे अनेक बाजूंनी कारखान्यांचा अभ्यास केला जातो. क्रांती सहकारी साखर कारखान्याला त्यातील काटेकोर मूल्यमापन करून हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
पाचट कुजवून सेंद्रिय कर्ब वाढीसाठी केलेले प्रयत्न आणि यातून सकारात्मक आलेले निष्कर्ष, नवनवीन तंत्रज्ञान शेतकर्यांच्या बांधावर पोहोचवून त्याचा स्वीकार केला आहे. ऊसक्षेत्रात केलेली आधुनिक क्रांती या सगळ्याचा विचार करून क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्यास हा पुरस्कार नवी दिल्ली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र जनपथ येथे प्रदान करण्यात आला.
यावेळी दिलीप लाड, उद्योजक सचिन कदम, कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे, शेती अधिकारी दिलीप पार्लेकर, ऊस विकास अधिकारी विलास जाधव, श्रीकांत लाड, वसंत लाड, दिलीप थोरबोले, शीतल बिरनाळे, अनिल पवार, तात्यासाहेब वडेर, जयप्रकाश साळुंखे, संजय पवार, विजय पाटील, संग्राम जाधव, सुकुमार पाटील, अशोक विभुते, वैभव पवार, जितेंद्र पाटील, अश्विनी पाटील, अंजना सूर्यवंशी, अशोक पवार उपस्थित होते.