

सांगली : कोयना धरणातून आता ३९८३ क्युसेक विसर्ग सुरू केला आहे. वारणा धरणातूनही ९०० क्युसेक जलविसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे आगामी काळातील पाणीटंचाईची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे.
जिल्ह्यातील पाणीस्थितीच घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी झालेल्या बैठकीत पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजनांबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. सांगली जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन, कोयना धरणातून विसर्ग वाढवण्याची गरज व्यक्त केली.
सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सुरू असलेला विसर्ग क्युसेकमध्ये याप्रमाणे आहे. कोयना धरणातून ३९८३, धोम ६३०, कण्हेर ४०, धोम बलकवडी ५०५, उरमोडी ४००, तारळी २८५, वारणा ९००, दुधगंगा ७५० व अलमट्टी धरणातून १२ हजार १७५ क्युसेक विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची सोमवारची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल, सांगली ५.९ (४०), अंकली पूल, हरिपूर ५.२ (४५.११)
साठा, साठवण क्षमता
विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. मध्ये याप्रामाणात आहे. कोयना १०२.१२ (१०५.२५),धोम १२.७३ (१३.५०), कण्हेर ९.९७ (१०१०), धोमबलकवडी ३.९२ (४.०८), वारणा ३४.४० (३४.४०), राधानगरी ८.३४ (८.३६), दूधगंगा २५.३३ (२५.४०), अलमट्टी ११५.५५ (१२३).