

सांगली : ऐतिहासिक नगरीला आर्थिक महानगरीला जोडण्यासाठी प्रस्तावित असणार्या कोल्हापूर ते मुंबई ‘वंदे भारत’चा प्रवास अखेर दिवास्वप्नच ठरण्याची शक्यता आहे. प्रवाशांची मागणी असूनदेखील केवळ मध्य रेल्वेच्या आडमुठेपणामुळे हा प्रस्ताव रखडला आहे. खासदार, रेल्वे प्रवासी संघटनांनी वारंवार मागणी करूनदेखील याकडे कानाडोळा केला जात आहे. कोल्हापूर-मुुंबई ‘वंदे भारत’ सुरू करण्यासह प्रस्तावित नागपूर-पुणे स्लीपर ‘वंदे भारत’चा कोल्हापूरपर्यंत विस्तार करणे गरजेचे आहे.
देशात ‘वंदे भारत’च्या माध्यमातून रेल्वेला सुपरफास्ट ट्रॅकवर आणले जात आहे. परंतु यातून पश्चिम महाराष्ट्राला मात्र जाणून-बुजून वगळले जात असल्याचे चित्र आहे. कोल्हापूर-मुंबई ‘वंदे भारत’ सुरू करावी, अशी कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील खासदार, रेल्वे प्रवासी संघटनांची मागणी आहे. कोल्हापूरमधील खासदार धनंजय महाडिकदेखील याचा सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. सध्या महाराष्ट्रात मुुंबई-गांधीनगर, मुंबई-अहमदाबाद, मुंबई-जालना, मुंबई-मडगाव, मुंबई-सोलापूर, मुंबई-शिर्डी, नागपूर-बिलासपूर, नागपूर-इंदोर, नागपूर-सिकंदराबाद, पुणे-कोल्हापूर आणि पुणे-हुबळी या ‘वंदे भारत’ धावत आहेत. राज्यातील सर्व महत्त्वाची शहरे मुंबईला ‘वंदे भारत’ने जोडली जात असताना, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांवर सातत्याने अन्याय केला जात आहे.
कोल्हापूर ते मुंबई ‘वंदे भारत’ सुरू करावी, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. परंतु मध्य रेल्वेकडून वारंवार काही ना काही कारणे देत, हा प्रस्ताव रखडवला जातो. मुंबईत झालेल्या मध्य रेल्वेच्या सल्लागार सदस्यांच्या बैठकीतदेखील हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. परंतु कोल्हापूर-मुंबई ‘वंदे भारत’ सुरू करण्यासाठी लोणावळा घाटात अडचण असल्याचे कारण मध्य रेल्वेकडून देण्यात येते. कोल्हापूर-मुंबई ‘वंदे भारत’ सुरू करण्यासाठी लोणावळा घाटात अडचण असेल, तर मुंबई - सोलापूर ‘वंदे भारत’ कशी धावते? मुंबई-जालना, मुंबई-शिर्डी या ‘वंदे भारत’देखील याच घाटातून धावतात. त्यामुळे कोल्हापूर-मुंबई ‘वंदे भारत’साठी काहीच अडचण नाही. परंतु मध्य रेल्वेच्या काही अधिकार्यांच्या आडमुठेपणामुळे ‘वंदे भारत’ सुरू केली जात नाही, असा आरोप प्रवासी संघटनांकडून केला जात आहे.
कोल्हापूर-पुणे ‘वंदे भारत’ सुरू केली. ही गाडी आठवड्यातून तीन दिवस धावते. या फेरीस प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. परंतु सांगली, कोल्हापूर आणि सातारा हे तीनही जिल्हे मुंबईला सुपरफास्ट जोडणे आवश्यक आहे. सध्या कोल्हापूरमधून मुंबईला जाण्यासाठी नियमित एक्स्प्रेसने 9 ते 10 तासांचा अवधी लागतो. मात्र ‘वंदे भारत’ सुरू झाल्यास हा प्रवास 7 तासावर येणार आहे. त्यामुळे कोल्हापूर-मुंबई ‘वंदे भारत’ तातडीने सुरू करण्याची गरज व्यक्त होत आहे. कोल्हापूर-मुंबई ‘वंदे भारत’ सुरू झाल्यास कोल्हापूर, मिरज, सांगली, कराड, सातारा येथील प्रवाशांची सोय होईल. तसेच वेळेत बचत होणार असल्याने या एक्स्प्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळू शकतो. रेल्वेच्या उत्पन्नातदेखील भर पडू शकते. त्यामुळे मध्य रेल्वेने आता कोणतेही आढे-वेढे न घेता तत्काळ कोल्हापूर-मुंबई ‘वंदे भारत’ सुरू करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
तसेच नागपूर विभागाकडून राज्यात दोन स्लीपर ‘वंदे भारत’ सुरू करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. नागपूर-मुंबई आणि नागपूर-पुणे अशी स्लीपर ‘वंदे भारत’ देण्याची मागणी नागपूर विभागाने रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे. त्याला रेल्वे मंत्रालयाचा सकारात्मक प्रतिसाद आहे. त्यामुळे आगामी काळात नागपूर-पुणे स्लीपर ‘वंदे भारत’ सुरू होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातून विदर्भात जाणार्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे नागपूर-पुणे स्लीपर वंदे भारत केवळ पुण्यापर्यंत सुरू न करता तिचा मिरजमार्गे कोल्हापूरपर्यंत विस्तार करणे गरजेचे आहे. त्यामुळे सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांची सोय होणार आहे.
सध्या पश्चिम महाराष्ट्रातून विदर्भात कोल्हापूर-गोंदीया महाराष्ट्र एक्स्प्रेस धावते. पण नागपूर-पुणे स्लीपर ‘वंदे भारत’चा कोल्हापूरपर्यंत विस्तार झाल्यास पश्चिम महाराष्ट्र विदर्भाशी सुपरफास्ट जोडला जाईल. त्यामुळे कोल्हापूर-मुंबई नवीन ‘वंदे भारत’ सुरू करण्यासह नव्याने प्रस्तावित असणार्या नागपूर-पुणे स्लीपर ‘वंदे भारत’चा विस्तार होणे गरजेचे आहे.
कोल्हापूमधून कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस, कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस धावते, तर मिरज मार्गे वरील दोन गाड्यांसह हुबळी-दादर एक्स्प्रेस आणि चालुक्य एक्स्प्रेस या एक्स्प्रेस गाड्या धावतात. मुंबईला जाण्यासाठी कोल्हापूरकरांना दोन, तर मिरज, सांगलीकरांना चार एक्स्प्रेस उपलब्ध आहेत. परंतु या सर्व एक्स्प्रेस नेहमी फुल्ल असतात. त्यामुळे प्रवाशांना नाईलाजास्तव खासगी बसने प्रवास करावा लागतो. कोल्हापूर-मुंबई ‘वंदेभारत’ सुरू झाल्यास प्रवासी वेळेत बचत होईलच, पण प्रवाशांचा प्रवासदेखील सुलभ होणार आहे. तसेच रेल्वेच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे. त्यामुळे तातडीने ही ‘वंदे भारत’ सुरू होण्याची गरज आहे.