सांगली : खरसुंडी यात्रा आढावा बैठकीत मूळ प्रश्नांना बगल

Kharsundi yatra: कागदी घोडे नाचवून झाले नियोजन
Kharsundi yatra
खरसुंडी यात्रा आढावा बैठक प्रांताधिकारी विक्रम बादल,उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील,तहसीलदार सागर ढवळे,पोलीस निरीक्षक विनय बहीर, देवस्थानचे अध्यक्ष चंद्रकांत पुजारी ,सरपंच धोंडीराम इंगवले,बाजार समिती सभापती संतोष पुजारी यांच्या उपस्थितीत पार पडली.pudhari photo
Published on
Updated on

आटपाडी : खरसुंडी ता. आटपाडी येथे २५ एप्रिल रोजी होणाऱ्या श्री सिद्धनाथांची सासणकाठी व पालखी सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित विविध विभागांची आढावा बैठक कागदी घोडे नाचवत मुळप्रश्नांना बगल देत संपन्न झाली. रिवाजानुसार कागदोपत्री झालेल्या बैठकीत ठोस नियोजन झालेच नाही.

खरसुंडी श्री सिद्धनाथ देवस्थान सभागृहात प्रांताधिकारी विक्रम बादल,उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील , तहसीलदार सागर ढवळे, पोलीस निरीक्षक विनय बहीर, देवस्थानचे अध्यक्ष चंद्रकांत पुजारी ,सरपंच धोंडीराम इंगवले , उपसरपंच राजाक्का कटरे , बाजार समिती सभापती संतोष पुजारी आणि विविध विभांगांचे खाते प्रमुख , ग्रामस्थ व मानकरी उपस्थित होते.

यात्रा आढावा बैठकीत सासणकाठी, पालखी मिरवणूक, यात्रेच्या निमित्ताने येणाऱ्या अडचणी व उपाययोजना बाबत ठोस चर्चा होण्याची गरज होती. पण प्रशासनाच्या विविध विभागांनी नेहमीप्रमाणे उपाययोजनांचे सादरीकरण केले. या उपायांची अंमलबजावणी व यशस्वीता अशी विस्तृत चर्चाच झाली नाही. खरसुंडी येथील अतिक्रमण , पार्किंग ,पर्यायी मार्ग आणि मुख्य सोहळ्या दरम्यान होणारी गर्दी आणि चेंगराचेंगरी याबाबत कोणताच ठोस कृती आराखडा बैठकीत तयार झाला नाही.

ग्रामविकास अधिकारी कामेश्वर ऐवळे यांनी स्वागत करून यात्रेच्या निमित्ताने ग्रामपंचायतने केलेल्या तयारी बाबत माहिती दिली. यात्रा कालावधीत जागा वाटप,सी .सी.टी.व्ही. यंत्रणा, पिण्याचे पाणी, पर्यायी मार्ग या तयारीची माहिती दिली. देवस्थान समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पुजारी यांनी मंदिरातील दर्शन व्यवस्था,सुरक्षा रक्षक , वीज पाणी इत्यादी तयारी झाल्याचे सांगितले . तालुका आरोग्य अधिकारी साधना पवार यांनी आरोग्य विषयक उपाययोजनां बाबत माहिती दिली. आटपाडी आगार व्यवस्थापक राहुल देशमुख यांनी एस. टी. वाहतुकीबाबत माहिती दिली. अन्य विभागांनी आढावा सादर केला.

यावेळी विठ्ठलापूर येथील बाड मानकऱ्यांनी त्यांची नैवेद्य करण्याच्या पूर्वपार जागेबाबत समस्या मांडली. स्थानिक देवस्थान समिती व मानकरी यांच्यात चर्चेअंतर्गत तोडगा निघाला . ग्रामपंचायत सदस्य विक्रम भिसे यांनी बाळेवाडी रस्त्यावर असणाऱ्या समस्या मांडल्या. वेजेगाव ग्रामस्थांनी मुख्य सोहळ्या वेळी पालखीच्या पुढे असणाऱ्या गाय आणि अश्वामुळे सासणकाठीच्या मार्गात अडचणी येत असल्याचे सांगितले.

शिवसेना तालुका प्रमुख शेखर निचळ यांनी ग्रामपंचायत व देवस्थान ट्रस्ट यांचेकडून होणाऱ्या उपाययोजना पुरेश्या नाहीत अशी नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्यांनी सर्व यंत्रणाना सूचना देण्याची मागणी केली . यावेळी विविध गावचे मानकरी , ग्रामस्थ उपस्थित होते.

बैठकीमध्ये प्रमुख मागण्या

  • जोगेश्वरी मंदीर ते येताळबा मंदीर दरम्यान धुपारतीस मार्ग मोकळा ठेवावा .

  • एस .टी. थांब्यावर पिण्याच्या पाण्याची सोय करावी .

  • यात्रा कालावधीत अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना प्रवेश देण्यात यावा.

  • सासणकाठी व पालखी मिरवणुकीवर इमारतीवरून फेकण्यात येणाऱ्या खोबऱ्यांच्या वाट्यावर बंदी घालण्यात यावी .

  • पालखी सोहळ्यावेळी होणारी गर्दी व चेंगराचेंगरी टाळण्यासाठी जोतीबा यात्रेप्रमाणे व्यवस्था ठेवावी .

  • यात्रा कालावधीत वाहतुकीचे नियोजन करावे.

  • घोडेखुर येथे स्नानासाठी होणारी संभाव्य गर्दी नियंत्रण करण्यासाठी पोलीस बंदोबस्त, निवारा, पाण्याची व्यवस्था करावी .

खरसुंडी येथील यात्रेस शेकडो वर्षाची परंपरा आहे. येणाऱ्या भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाला सहकार्य करा. यात्रेमध्ये प्रशासनाने घालून दिलेले नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल .

विक्रम बांदल ( प्रांताधिकारी उपविभाग विटा )

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news