

आटपाडी : खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ देवस्थान ट्रस्टच्या कारभारात गंभीर अनियमितता व भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सांगली जिल्हाध्यक्ष व जिल्हा नियोजन समिती सदस्य राजेंद्र खरात यांनी केली आहे. याबाबत सांगली येथील धर्मादाय आयुक्तांकडे निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ मंदिरात लाखो भाविकांकडून रोख देणग्या तसेच सोने-चांदीच्या वस्तू दान केल्या जातात. मात्र या देणग्यांची व्यवस्थित नोंद देवस्थान ट्रस्टकडे उपलब्ध नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. मंदिराच्या गाभाऱ्यातील दोन दगडी खांबांवर वेजेगाव येथील बालाजी निकम आणि देविखिंडी येथील शिवाजी पाटील यांनी सुमारे 51 किलो चांदीचे नक्षीकाम केलेल्या प्लेटा बसवून दिल्या होत्या. तसेच मंदिरातील इतर चार खांबांवरही सुमारे 130 किलो चांदीच्या नक्षीकामाच्या प्लेटा बसवण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र या चांदीच्या वस्तू सध्या मंदिरात दिसत नसल्याचा आरोप निवेदनात आहे.
याबाबत देणगीदार शिवाजी पाटील यांनी याबाबत आटपाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे म्हटले आहे. चांदीचा रथ तयार करण्यासाठी सुमारे एक टन चांदी गोळा केली होती. मात्र तयार झालेला रथ केवळ साडेतीनशे किलो वजनाचा असल्याचा आरोप केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी अथवा खासगी स्वरूपात गुन्हे दाखल करण्यास परवानगी द्यावी, तसेच देवस्थान ट्रस्ट बरखास्त करून मंदिरावर प्रशासक नेमावा, अशी मागणीही निवेदनात केली आहे.