

आटपाडी : खरसुंडी (ता. आटपाडी) येथील पौषी जनावरांची यात्रा यंदा केवळ परंपरेचा उत्सव न राहता कोट्यवधींच्या उलाढालीचा आर्थिक मेळा ठरला. जातिवंत खिलार जनावरांसाठी राज्यभर ओळख असलेल्या या यात्रेत सात कोटी रुपयांहून अधिक खरेदी-विक्री झाली. कृषी उत्पन्न बाजार समितीकडे सुमारे सात कोटींची नोंद झाली आहे. प्रत्यक्ष व्यवहारांचा विचार करता ही उलाढाल अधिक असल्याचे बोलले जात आहे.
यंदा बाजार समिती व ग्रामपंचायतीतर्फे खरसुंडी-नेलकरंजी रस्त्यावरील घोडे खूर येथे ही यात्रा भरविण्यात आली आहे. सुमारे 50 एकर खुल्या माळावर पसरलेल्या या बाजारात पहाटेपासून जनावरांच्या सौद्यांची लगबग सुरू होती. यात्रेच्या प्रत्येक दिवशी बाजारतळावर शेतकरी, व्यापारी आणि पाहुण्यांची मोठी गर्दी दिसून येत होती. यात्रेच्या पहिल्या टप्प्यातच शेळ्या-मेंढ्यांच्या बाजाराने वेग घेतला. दोन दिवसांतच या बाजारात सुमारे सात लाखांची उलाढाल झाली. मोठ्या जनावरांची संपूर्ण यात्राकाळात 20 हजारांहून अधिक आवक झाली आहे. विशेषतः कमी वयाच्या खिलार खोंडांची खरेदी सर्वाधिक झाली. तरुण, तगडे आणि शर्यतीसाठी उपयुक्त खोंडांना अपेक्षेपेक्षा चांगले दर मिळाले.
या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे कर्नाटकातून आलेले ‘हेडी’ व्यापारी. त्यांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री करत बाजारात चांगलीच चुरस निर्माण केली. यंदा 20 हजारांपासून थेट 75 हजार रुपयांपर्यंत दराने खोंडांचे व्यवहार झाले. विशेषतः शर्यतीसाठी लागणाऱ्या मोठ्या खोंडांना प्रचंड मागणी असल्याने दरात वाढ झाली.
पुणे, सातारा, बारामती आदी भागातील शेतकऱ्यांनीही यात्रेत सक्रिय सहभाग नोंदवला. शर्यतीसाठीची मागणी वाढली असली तरी शेती-कामासाठी वापरल्या जाणाऱ्या बैलांना तुलनेने कमी मागणी असल्याचे चित्र यंदा दिसून आले. दरम्यान, खरसुंडी - भिवघाट रस्त्यावरील वीज मंडळाजवळील घोडे खूर येथे भरलेल्या बाजारतळावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी, सरपंच धोंडिराम इंगवले यांनी पाणी व वीज पुरवठ्याची चांगली व्यवस्था केली होती.