

आटपाडी : खरसुंडी (ता. आटपाडी) येथील माणदेशी खिलार जनावरांच्या पौष यात्रेत यंदा पहिल्याच दिवशी विक्रमी उत्साह पाहायला मिळाला. सुमारे 10 ते 12 हजार जनावरांची आवक झाली असून, अंदाजे एक कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी आणि सचिव शशिकांत जाधव यांनी दिली.
माणदेशी खिलार जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी खरसुंडीची यात्रा तीन राज्यांमध्ये प्रसिद्ध आहे. यंदाही शेतकऱ्यांनी जनावरांना आकर्षक सजावट करून, हलगी व पारंपरिक वाद्यांच्या गजरात यात्रेत सहभाग नोंदवला.
या यात्रेत महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश येथील शेतकरी व व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. खरसुंडी-नेलकरंजी रस्त्यावर भरवण्यात आलेल्या या यात्रेत सांगली, सातारा, कोल्हापूर भागातील शेतकरी विक्रीसाठी जनावरे घेऊन आले होते, तर पुणे जिल्ह्यासह राज्यातील व परराज्यातील शेतकरी खरेदीसाठी दाखल झाले होते. शेळ्या-मेंढ्यांच्या बाजारात पाच ते सात लाखांची उलाढाल झाली. आटपाडी येथील बाजारामुळे काही प्रमाणात उलाढाल कमी झाली असली, तरी एकूण पहिल्या दिवशी कोटींची उलाढाल झाली.
दरम्यान, खरसुंडी येथील रस्त्याचे काम सुरू असल्याने जनावरे वाहतूक करताना अडथळे येत होते. मात्र, आमदार सुहास बाबर यांनी यात्रा पूर्ण झाल्यानंतरच काम करण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्याने हा प्रश्न मार्गी लागला. बाजार समिती व ग्रामपंचायतीमार्फत दिवाबत्ती व पिण्याच्या पाण्याची चांगली व्यवस्था करण्यात आल्याने यात्रेकरू व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.