

आटपाडी: पुढारी वृत्तसेवा खरसुंडी येथील श्री सिद्धनाथाची चैत्र यात्रा 25 एप्रिल रोजी होत आहे. यात्रा कालावधीत माणदेशी खिलार जनावरांची मोठी यात्रा भरते. ही यात्रा घाणंद - घरनिंकी रस्त्यावर भरवण्याचा घाट घातला जात आहे. परंतू ही जागा अपुरी आणि गैरसोयीची असल्याने खरसुंडी नेलकरंजी रस्त्यावरील प्रशस्त माळावर भरवली जावी अशी मागणी ग्रामस्थांच्या मधून होत आहे.
खरसुंडी येथे चैत्र आणि पौष महिन्यात खिलार जनावरांची मोठी यात्रा भरते. सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यातील आणि कर्नाटकातील अनेक शेतकरी आणि व्यापारी या यात्रेला हजेरी लावतात. हजारो जनावरे यात्रेत दाखल होतात. घाणंद - घरनिंकी रस्ता परिसरात यात्रेसाठी जागा अपुरी असताना देखील यंदा यात्रा त्या ठिकाणी भरवण्याचे नियोजन केले जात आहे.
घाणंद - घरनिंकी रस्ता परिसरात यात्रेस पुरेशी जागा नाही. शेतकरी, व्यापारी आणि जनावरांची मोठी गर्दी होत असल्याने वाहतुकीची कोंडी होते. सिद्धनाथ मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची देखील गैरसोय होते. ही समस्या सोडविण्यासाठी शासकीय यंत्रणा आणि ग्रामपंचायतने तात्काळ तोडगा काढण्याची गरज आहे.
खरसुंडी नेलकरंजी रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोकळे माळरान आहे. या ठिकाणी यात्रा भरल्यास शेतकरी, व्यापाऱ्यांची चांगली सोय होते. वाहतूक करणे सर्वांच्या सोयीचे आहे. एक यात्रा नेलकरंजी रस्त्याला आणि दुसरी घाणंद-घरनिंकी रस्त्याला भरवायचा निर्णय आता व्यवहार्य राहिलेला नाही.
घाणंद-घरनिंकी रस्त्यावर आता अनेक घरे उभारली आहेत. ही जागा यात्रेसाठी पुरेशी नाही. त्यामुळे ही यात्रा घाणंद-घरनिंकी रस्त्यावर भरवण्याचा ठराविक जणांचा अजेंडा मोडून काढत ही यात्रा नेलकरंजी रस्त्यावर भरवावी अशी मागणी ग्रामस्थांच्या मधून होत आहे.