

Kharasundi Chaitri Yatra
आटपाडी : खरसुंडी (ता. आटपाडी) येथील खिलार जनावरांच्या चैत्र यात्रेस मोठा प्रतिसाद मिळाला. यात्रेत चार जिल्ह्यातील १० ते १२ हजार जनावरे दाखल झाली होती. यंदा यात्रेत विक्रमी ७ कोटी रुपयांची उलाढाल झाली. उन्हाच्या तीव्रतेने ही यात्रा अवघ्या तीन दिवसांत आटोपली.
खरसुंडी येथील जनावरांच्या यात्रेला मंगळवारी सुरुवात झाली. दररोज जनावरांची आवक वाढत होती. शुक्रवारी यात्रेच्या शेवटच्या दिवसाअखेर १० ते १२ हजार जनावरे दाखल झाली होती. यात्रेत पाच कोटींहून अधिक रकमेची उलाढाल होईल अशी अपेक्षा व्यक्त होती. प्रत्यक्षात ७ कोटींची उलाढाल झाली.
महाराष्ट्र, कर्नाटक,आंध्रप्रदेश या तिन्ही राज्यात प्रसिद्ध असणाऱ्या सिद्धनाथाच्या सासनकाठी आणि रथोत्सवा बरोबर जनावरांची मोठी यात्रा भरते. जागेबाबत वेगवेगळ्या मागण्या झाल्यानंतर घाणंद रस्त्यावर ही जनावरांची यात्रा झाली. यात्रेत जनावरांची मोठी आवक झाली.
जातीवंत खिलार जनावरांसाठी खरसुंडी यात्रा प्रसिद्ध आहे. पैदास करण्यासाठी, शेती करण्यासाठी आणि शर्यतीसाठी लागणाऱ्या जना वरांच्या शोधात शेतकरी माळ धुंडत होते. खिलार जनावरांच्या यात्रेत जातीवंत बैलांना मोठी किंमत मिळाली.खिलार बैलांना ५० ते ७५ हजार रुपयांचा भाव मिळाला.
सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यातून प्रामुख्याने मोठी आवक झाली. तालुक्यातील गावातूनही मोठया प्रमाणावर आवक झाली.बाजार समिती मार्फत आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने यात्रेत पाणीपुरवठा,पार्किंग,आरोग्य आणि वीजेची सोय करण्यात आली होती. पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सभापती संतोष पुजारी, उपसभापती सुनील सरक, सचिव शशिकांत जाधव आणि संचालकांनी, सरपंच धोंडीराम इंगवले, ग्रामसेवक कामेश्वर ऐवळे, चिचाळेचे सरपंच संजय कदम आणि माजी सरपंच गजानन गायकवाड यांनी यात्रेतील येणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पिण्याच्या पाण्याची सोय,सिसिटीव्ही यंत्रणा, पार्किंग व्यवस्था आणि जनावरांच्या साठी वैद्यकीय पथकाची सोय केल्याने शेतकऱ्यांची चांगली सोय झाली.