Sangli Rain : द्राक्षाचं मणीच नुसतं फुटलं नाय, तर आमचं नशीब बी फुटलं!

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा
Sangli Rain
Sangli Rain
Published on
Updated on

विजय लाळे

विटा : “साहेब, या अवकाळीच्या गारपिटीनं द्राक्षाचं नुसतं मणीच फुटलं नाय, तर आमचं नशीब बी फुटलंय. आता नुसती तोंडदेखली मदत नको, तर भरपाई द्या, घातलेलं पैसं तरी मिळवून द्या..!” करंजे गावचे विठ्ठल दशरथ कापसे अक्षरशः थरथरत बोलत होते.

खानापूर घाटमाथ्यावरील करंजे, हिवरे, पळशी, बाणूरगड, ताडाचीवाडी, सुलतानगादे, कुसबावडे आदी गावांत गुरुवारी अवकाळी पाऊस पडला. मात्र पडताना या पावसाने सोबत आणलेल्या मोठमोठ्या गारांमुळे हाता-तोंडाशी आलेले द्राक्षपीक तसेच इतर पिके पूर्णतः जमीनदोस्त झाली. निर्यातक्षम द्राक्षबागांचेही प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. यात करंजे गावाच्या शिवारातील दीड एकरातली विठ्ठल दशरथ कापसे यांची भरात आलेली द्राक्षबाग गारपिटीच्या तडाख्यात सापडली. दीड एकरात पाणी पाणी झाले. जवळपास प्रत्येक घडावर गार पडली.

फुटलेल्या द्राक्षांच्या मण्यातून आणि विठ्ठल कापसे यांच्या डोळ्यातून एकाच वेळी पाणी वाहत होते. या भागाला शुक्रवारी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, विटा शहर उपाध्यक्ष गजानन सुतार, सतीश शिंदे, सचिन गोतपागर यांनी भेट दिली. तिथे पंचनामे सुरू होते. मंडल अधिकारी महादेव पाटील यांच्यासमोर विठ्ठल कापसे हुंदका आवरत म्हणाले, “परवाच एक व्यापारी बाग बघून गेला होता. 103 रुपये किलोपर्यंत दर ठरला. पन्नासएक लाख हातात पडतील असं वाटत होतं. मागचा हंगाम पण अवकाळीनच गेला. गारा आल्या आल्या म्हणस्तोवर झिम्माड सडा सुरू झाला. बागा झाकायलाही वेळ दिला नाय.” संपूर्ण घाटमाथ्यावर अशीच परिस्थिती आहे. या गारपिटीमुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत, अशी व्यथा चंद्रकांत चव्हाण यांनी मांडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news