

सांगली : हिवाळ्यात ऊस रसाला चांगला उतारा पडत असल्याने गुऱ्हाळांची चलती आहे. विनारसायन आणि चिक्की गुळाची मागणी दुपटीने वाढली आहे. यंदा गूळ पावडरची मागणी अधिक आहे. त्यामुळे सांगली मार्केटमध्ये रोज 300 ते 400 टन गुळाची आवक होत आहे. कर्नाटकातील रायबागमधून गुळाची रोज आवक होते.
कर्नाटकात पाऊस वाढल्यामुळे वाहतुकीस अडथळे येत आहेत. हवेतील आर्द्रतेमुळे गुळाच्या साठवणुकीतही अडचणी येतात. यंदा दरातही किलोमागे 4 ते 5 रुपयांची वाढ झाली आहे. क्विंटलमागे 400-500 रुपये दरवाढ आहे. 90 टक्के गूळ रायबाग तालुक्यातून येतो. एक, अर्धा आणि पाव किलोच्या ढेपा, 10 किलोच्या भेली आणि 30 किलोचे रवे अशा स्वरूपात गूळ येतो. किराणा दुकानदारांकडून 5, 10, 30 किलोच्या ढेपांची मागणी वाढत असल्याची माहिती गूळ व्यापारी आदर्श हुक्केरी यांनी दिली. गुळाच्या छोट्या क्युब आणि वड्याही अलीकडे बनवल्या जात आहेत.
मुंबई, गुजरात, आंध्र प्रदेश, राजस्थानला रवानगी
सांगली मार्केटमध्ये रोज 300 ते 400 टन गुळाची आवक होते आणि सुमारे 150 टन गूळ रोजच मुंबईला पाठवला जातो. रोज गुळाचे 10 ते 15 ट्रक मुंबईला रवाना होतात. आंध्र प्रदेशात 10 ट्रक जातात. सफेद गूळ गुजरातला पाठवला जातो. राजस्थानला सेंद्रिय रसायनविरहित गूळ पाठवला जातो.
ब्रँडेड गुळाला पसंती
सेंद्रिय गुळाबरोबरच ब्रँडेड गुळालाही ग्राहकांची पसंती आहे. दहा वर्षांत सेंद्रिय गुळाबाबत ग्राहकांमध्ये जागृती झाली आहे.
शेतीतही गुळाचा वापर
पाच-सहा वर्षांपासून शेतीत डाळिंब बागा आणि इतर फळांच्या लागवडीत गुळाचे पाणी वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी स्वतंत्र गूळ पावडर मिळते. ती 38 रुपये किलो आहे. फळांचा गोडवा वाढवण्यासाठी गुळाचे पाणी बागांना शेतकरी घालतात, असे गूळ व्यापाऱ्यांनी सांगितले. कोंबडी पशुखाद्यातही गुळाचा वापर केला जातो. त्यामुळेही गुळाला मागणी वाढली आहे.