कवठेमहांकाळ : नागज फाट्यानजीक भीषण अपघात; भरधाव कारची ट्रकला धडक, दोघे जागीच ठार

कवठेमहांकाळ : नागज फाट्यानजीक भीषण अपघात; भरधाव कारची ट्रकला धडक, दोघे जागीच ठार

नागज; पुढारी वृत्तसेवा : भरधाव कारने थांबलेल्या ट्रकच्या मागच्या बाजुला जोरात धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोघेजण जागीच ठार झाले तर दोघेजण जखमी झाले आहेत. सर्वजण सातारा जिल्ह्यातील आहेत. ही घटना रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज फाट्यानजीकच्या पेट्रोलपंपासमोर मंगळवारी (दि.७) दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, माण तालुक्यातील पवार कुटूंबीय कारने (क्र.एम.एच.११ ए.७६५८) तुळजापूरला देवदर्शनासाठी गेले होते. त्यानंतर तुळजापूरहून कोल्हापूरला जोतिबा देवदर्शनासाठी जात होते. दरम्यान नागज फाट्याजवळील गणेश पेट्रोलपंपाजवळ कारचालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे या कारची थांबलेल्या ट्रकच्या ( क्र.एम.एच २३-७२७०) मागील बाजूस जोरात धडक बसली. ही धडक इतकी जोरात होती की कारचा अक्षरश: चक्काचूर झाला होता. अपघातात कारच्या डाव्या बाजूला बसलेले आनंदराव शिवराम पवार (वय ६८) व माणिकराव साहेबराव पवार (वय ५४) हे जागीच ठार झाले. उषाताई आनंदराव पवार (वय ६०) व कारचालक स्वप्निल आनंदराव पवार (वय २५) हे जखमी झाले. हे सर्वजण कळसकरवाडी, ता. माण, जि. सातारा येथील रहीवासी आहेत.

जखमींना मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी कारच्या सुट्या भागांचा तसेच फुटलेल्या काचांचा खच, पाण्याच्या बाटल्या व अन्य साहित्य विखुरलेले होते. कारमध्ये तसेच रस्त्यावर जखमी व मृतांच्या रक्ताचे पाट वाहताना दिसत होते. सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर गोडे, विनोद चव्हाण यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात झाली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news