

कविता अशोक पाटील सांगली जिल्ह्यातील तुंग या छोट्या गावातली. जन्मत:च तिच्या पाठीला गाठ होती. ती आठ महिन्यांची असताना सांगलीत तिच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि दुर्दैवाने स्पायनल क्वॉड इन्जुरीची ती बळी ठरली. तिचे कमरेखालील शरीर पूर्ण संवेदनाहीन बनले. तरीही आपल्या आयुष्यातील संवेदना जपत, कर्तृत्व गाजवत जगणारी आणि इतरांनाही जगवणारी कविता समाजासाठी आदर्श आहे.
कविताच्या आई-वडिलांनी खूप रुग्णालये पालथी घातली, देवधर्म केला, परंतु काही बदल होणे शक्य नव्हते. अशावेळी कविता शाळेत जायचा हट्ट करायची. तिचे वडील कडेवर घेऊन रोज तिला शाळेत सोडायचे आणि आणायचे. चौथीपर्यंत शाळेत ती पालकांच्या कडेवर बसूनच गेली. परंतु नंतर अडचणी वाढत गेल्या. तिच्या वडिलांनी खास तिच्यासाठी तीनचाकी सायकल बनवून घेतली. शिक्षक, मित्रमैत्रिणी सगळ्यांनीच मदतीचा हात दिला. सार्यावर मात करत कवितानं दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. इतकंच नाही, तर अर्थशास्त्र आणि मराठीमध्ये एम.ए. झाली. बी.एड्. केलं. नोकरी न करता स्वत:चे क्लासेस सुरू केले. जिद्दीनं ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली आणि जिंकलीही. सरपंच होता होता राहिली. गावातील मंदिर, पतसंस्था, कार्यालये, शाळांमध्ये दिव्यांगांसाठी स्वतंत्र जाण्या-येण्याची सोय करून ठेवली.
कल्पवृक्ष फाऊंडेशन स्थापन करून दिव्यांंगांसाठी कार्य करण्याचा वसा तिनं घेतला आहे. आजपर्यंत तिच्या फाऊंडेशनमार्फत 16 दिव्यांंगांना व्हीलचेअर दिल्या आहेत. महिलादिनी ती आरोग्य शिबिरांचे आयोजन करते. दिव्यांंगांसाठीच्या संस्थांमध्ये जाऊन व्याख्याने देते, मार्गदर्शन करते. हे करण्यासाठी तिने तीनचाकी स्कुटीवरून प्रवास केला आणि नंतर धाडसानं चारचाकीही शिकली. आता ती एकटी पुण्यापर्यंतचा प्रवास चारचाकी चालवत करते. ठरवलं ते काम तडीस न्यायचंच, हा तिचा ध्यास आजही कायम आहे. दिव्यांंगत्वावर मात करत आयुष्य हसरं करणारी कविता हसून सांगते... मला अजूनही दिव्यांंगांसाठी बरीच कामं करायची आहेत. लांबचा पल्ला गाठायचा आहे. प्रत्येक दिव्यांंगाला शिक्षणातून समृध्द करायचं आहे.