

सांगली : कवठेमहांकाळ येथील डॉ. म्हेत्रे यांच्या घरावरील बोगस आयकर छापा प्रकरणातील आणखी दोघांना सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणने अटक केली. गुरुवारी तिघांना कोल्हापूर, पुणे येथून अटक करण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी दोघे पोलिसांसमोर सांगलीत शरण आले. अक्षय सुरेश लोहार (वय 30, रा. हुक्केरी, जि. बेळगाव) आणि शकील गौस पटेल (44, रा. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत.
कवठेमहांकाळ येथे डॉ. जगन्नाथ म्हेत्रे यांच्या घरावर चौघांनी ‘स्पेशल 26’ चित्रपटाप्रमाणे बोगस छापा टाकला होता. त्यांना अन्य तिघांनी सहकार्य केले होते. याप्रकरणी दीक्षा राष्ट्रपाल भोसले, पार्थ महेश मोहिते आणि साई दीपक मोहिते या तिघांना अटक केली आहे. या तोतयांनी एक किलो 410 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 15 लाख 60 हजाराची रोकड असा मुद्देमाल लंपास केला होता. अटक केल्यानंतर त्यांच्याकडून एक कोटी 20 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, पसार असणार्या मुख्य सूत्रधारासह अन्य चौघांचा शोध सुरू आहे. यापैकी अक्षय लोहार आणि शकील पटेल हे दोघे पोलिसांना शरण आले, तर मुख्य सूत्रधार महेश शिंदे व आदित्य मोरे हे दोघे अद्याप फरार आहेत. दोघांच्या मागावर पोलिसांची पथके रवाना करण्यात आलेली आहेत. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या अक्षय आणि शकील यांना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना दि. 24 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
मुख्य सूत्रधार महेश शिंदे याची पत्नी मुंबईत शासकीय रुग्णालयात रुग्णसेविका आहे. त्याचे वडील डॉक्टर आहेत. आईदेखील वैद्यकीय क्षेत्राशी निगडित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अद्याप तो फरार आहे.