

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ येथील विद्यानगर परिसरात घरासमोर उभ्या केलेल्या इलेक्ट्रिक दुचाकीच्या डिकीत ठेवलेले 50 हजार रुपये चोरट्याने लंपास केले. ही घटना दि. 29 नोव्हेंबररोजी दुपारी घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, फिर्यादी मनोहर गुरलदास चावला (वय 63, रा. विद्यानगर) यांचा विद्यानगर परिसरात बेकरी व्यवसाय आहे. शनिवार, दि. 29 नोव्हेंबररोजी ते घरामध्ये काही कामात गुंतले होते.
दरम्यान, त्यांनी आपली इलेक्ट्रिक दुचाकी (क्र. एमएच 10 ईएन 8683) घरासमोर उभी केली होती. दैनंदिन व्यवहारासाठी काढलेली 50 हजार रुपये रोख रक्कम त्यांनी दुचाकीच्या डिकीत ठेवली होती. घरासमोर कोणी नसल्याचे पाहून चोरट्याने त्यांच्या दुचाकीच्या डिकीतील ही रक्कम लंपास केली. काही वेळानंतर हा प्रकार चावला यांच्या लक्षात आला. घटनेनंतर त्यांनी तत्काळ कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदविली. फिर्यादीच्या वर्दीवरून पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सुरु आहे.