

कवठेमहांकाळ : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाला बळी पडून माजी सैनिकासह सहा जणांची 28 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी मुख्य संशयित रोहित राजाराम बोराडे (रा. कुकटोळी, ता. कवठेमहांकाळ) याला पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली आहे. न्यायालयाने त्याला 10 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
कवठेमहांकाळ तालुक्यातील मूळ रहिवासी व सध्या विश्रामबाग (सांगली) येथे वास्तव्यास असलेल्या दिलीप तानाजी पाटील (वय 45) यांनी याबाबत फिर्याद दिली होती. रोहित बोराडे याने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दोन ते तीन महिन्यांत भरघोस परतावा देण्याचे आमिष पाटील यांना दाखवले. सुरक्षेसाठी कोरा चेक देण्याचे आश्वासन देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. या आमिषाला बळी पडून पाटील यांनी एप्रिल 2023 मध्ये 4 लाख आणि ऑगस्ट 2023 मध्ये 3 लाख, असे एकूण 7 लाख रुपये बोराडेच्या खात्यावर जमा केले.
मात्र, परतावा देण्याऐवजी त्याने टाळाटाळ सुरू केली आणि नंतर फोन उचलणेही बंद केले. तपासादरम्यान हा फसवणुकीचा प्रकार केवळ पाटील यांच्यापुरता मर्यादित नसून, बोराडेने इतर पाच जणांनाही गंडा घातल्याचे उघड झाले. यामध्ये दादासाहेब भीमराव सलगर (हुपरी) 6 लाख 60 हजार, देविदास यशवंत गिड्डे (तडवळे) 6 लाख, विजय भीमराव माने (कवठेमहांकाळ) 4 लाख 20 हजार, अंकुश शहाजी चौगले (कुकटोळी) 3 लाख आणि दशरथ सुखदेव कोळेकर (कुकटोळी) यांच्याकडून 3 लाख रुपये घेतल्याचे समोर आले.
जानेवारी 2026 मध्ये गुन्हा दाखल झाल्यापासून बोराडे फरार होता. तो वारंवार आपली ठिकाणे बदलून पोलिसांना चकवा देत होता. पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक वैभव पाटील व त्यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे छत्रपती संभाजीनगर येथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.