

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ येथे कमंडलू नदीच्या पुलावरून वृद्ध महिलेला बनावट सोन्याचे बिस्किटे दाखवून 2 लाख 80 हजार रुपये किमतीचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीला कवठेमहांकाळ पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून लुटीतील दागिनेही हस्तगत करण्यात आले.
दि. 28 ऑक्टोबररोजी अनुसया मारुती दुधाळ (वय 60, रा. अग्रण धुळगाव, दुधाळ मळा) या भाजीपाला घेण्यासाठी जात होत्या. युवावाणी चौकाजवळ दोघांनी सोन्याचे बिस्कीट स्वस्तात देण्याचा बहाणा करून त्यांची 30 ग्रॅमची सोनसाखळी आणि 10 ग्रॅमची बोरमाळ, असा एकूण 2.80 लाखांचा ऐवज घेऊन पोबारा केला.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पथक करीत तपासाला गती दिली. संशयित विठ्ठल ग्यानबा जाधव (वय 29), मनोहर श्रीमंत गायकवाड (वय 40), धोंडिराम केरबा जाधव (वय 32), युवराज दादाराव गायकवाड (वय 57), बाळासाहेब युवराज गायकवाड (वय 26, सर्व रा. सलगरा, जि. लातूर) यांना ताब्यात घेतले. संशयिताकडून सर्व दागिने मिळवण्यात पोलिसांना यश आले. दरम्यान, अनुसया दुधाळ यांना पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांच्याहस्ते दागिने परत देण्यात आले.