

कवठेएकंद ः कवठेएकंद (ता. तासगाव) येथील ग्रामदैवत श्री सिद्धराज महाराज आणि नागावमधील श्री नागनाथ महाराज यांचा विजयादशमी (दसरा) पालखी सोहळा अभूतपूर्व उत्साह आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. तब्बल 14 तास रंगलेल्या या सोहळ्यात विविध मंडळांनी सादर केलेल्या नेत्रदीपक, नयनरम्य आतषबाजीने आसमंत उजळून निघाला, ज्यामुळे हजारो भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही विजयादशमीच्या सायंकाळी पारंपरिक मल्लखांब प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले. श्री बिर्हाडसिद्ध देवालयातून श्रींची पूजा होऊन, पाटील कट्टा येथील शिलंगण चौकात मानकरी चव्हाण-पाटील यांच्या उपस्थितीत आपटापूजन झाले आणि ग्रामप्रदक्षिणेला प्रारंभ झाला. फुलांनी सजवलेली श्री सिद्धराज महाराज व बिरदेव महालिंगराया यांची पालखी विद्युत रोषणाईने सजवलेला अश्व, छत्र, चामर, आरती दिवट्या आणि पोषाखधारी सेवेकरी यांच्या दिमाखात, ‘हर हरऽऽ’च्या गजरात पुढे सरकत होती. संपूर्ण ग्रामप्रदक्षिणा मार्गावर सुवासिनी महिलांनी ओवाळून श्रींचे दर्शन घेतले. सर्व दारू शोभा मंडळांनी प्रशासनाच्या सूचनेनुसार विशेष खबरदारी घेतली. प्रत्येक मंडळाच्या चोख नियोजनामुळे आणि ग्रामस्थांच्या संयोजनामुळे हा 14 तासांचा सोहळा पूर्णपणे सुरक्षित आणि विनाअपघात पार पडला.
कवठेएकंद येथील आतषबाजी सोहळ्यात केवळ पारंपरिक दारूकाम (लाकडी शिंगटे, औट, सुदर्शनचक्र, फुगडी, धबधबे, कारंजे)च नव्हते, तर यावर्षीच्या महत्त्वाच्या घडामोडींचे देखावेही साकारण्यात आले. गोल्डन युवाशक्तीने बाळुमामाच्या मेंढरांसह नदीतून प्रवासाचा देखावा सादर केला. ए-वन युवा मंच व ईगल फायर वर्क्सने ‘मिशन सिंदूर’ यशस्वी केल्याबद्दल विंग कमांडर व्योमिका सिंग आणि सोफिया कुरेशी यांचे आतषबाजीतून अभिनंदन केले. श्रीराम फायर वर्क्सने भारतीय लढाऊ विमानाची प्रतिकृती साकारून ‘ऑपरेशन सिंदूर’ पार पाडले. शहीद भगतसिंग मंडळाने ‘फायर शो’मधून अवकाशात औटांची बरसात करीत ‘तिरंगा शो’चे दर्शन घडविले. जमादार दारू शोभा मंडळाने अतिरेक्यांचा खात्मा ‘ऑपरेशन सिंदूर’ देखावा सादर केला. तोडकर बंधूंच्या ज्ञानदीप दारू शोभा मंडळाने सुदर्शन चक्र एस-400 एअर स्ट्राइकचा देखावा सादर केला. याशिवाय, अग्निपुत्र अजिंक्यतारा, लव्ह-कुश, शाक्यसिंह, शिवतेज, आकाशतारा, सिद्धराज फायर वर्क्स, सप्ततरंग, सिद्धिविनायक यांसह अनेक मंडळांनी नयनरम्य आणि कलात्मक आतषबाजीने सोहळ्यात रंगत आणली.
नागाव येथेही श्री नागनाथ महाराजांचा पालखी सोहळा रात्री 8 वाजल्यापासून दुसर्या दिवशी पहाटे 6 वाजेपर्यंत उत्साहाने पार पडला. याठिकाणी समाधान, टायगर, जनसेवा, गजराज, धूमधडाका, तिरंगा, अष्टविनायक आदी मंडळांनी पारंपरिक शिंगटे आणि नेत्रदीपक दारूकाम सादर केले. लक्षवेधी स्वागत कमानी उभारून सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. हजारो भाविकांनी हा ‘भक्ती आणि कलेचा’ अनोखा मिलाफ अनुभवला, तर अनेक कॅमेर्यांमधून हे क्षण सोशल मीडियावर पोहोचत होते.
पालखी परत श्री मंदिरात आल्यावर देवस्थान ट्रस्टकडून दारू शोभा मंडळे, मानकरी आणि सेवेकरी यांना श्रीफळ देऊन उत्सवाची सांगता करण्यात आली. या सोहळ्याला जगद्गुरू सूर्याचार्य कृष्णदेव नंदगिरी महाराज (जुना आखाडा), आमदार रोहित पाटील आणि प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश मसारे आदी उपस्थित होते.
या संपूर्ण सोहळ्यासाठी तहसीलदार अतुल पाटोळे, उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक भवड, पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ (कवठेएकंद), उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे (नागाव) यांच्यासह महसूल, आरोग्य पथक, अग्निशमन दल आणि महावितरणची यंत्रणा सज्ज होती. मराठा समाजाच्यावतीने वैद्यकीय सेवा कक्षही उभारण्यात आला होता. प्रशासकीय यंत्रणा, यात्रा कमिटी आणि दारू शोभा मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या चोख व्यवस्थापनामुळे सोहळा यशस्वी आणि सुरक्षित ठरला.